चिपळूण : शहरात सध्या कोविड लस घेण्यासाठी नगरपालिकेचे एकमेव केंद्र असल्याने नागरिकांची त्याठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे प्रशासनावर मोठा ताण येत असून, होणारी नागरिकांची गर्दी आवरणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे शहरात प्रभागनिहाय लसीकरणाचे नियाेजन करावे, अशी मागणी नगरसेविका स्वाती दांडेकर यांनी नगराध्यक्ष व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
लसीकरणासाठी हाेणारी गर्दी लक्षात घेऊन त्यांनी लसीकरण केंद्र वाढविणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. लसीकरणासाठी गर्दी हाेत असल्याने आम्हालाही नागरिकांचे अनेक फोन येत आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी नगर परिषद प्रशासन व तालुका वैद्यकीय विभाग यांनी शहरात प्रभागनिहाय किंवा दोन - तीन प्रभाग मिळून एकत्र लसीकरण केंद्र सुरू करावे. जेणेकरून हाेणारी गर्दी टाळता येऊ शकेल. तसेच नागरिकांची गैरसोय टळून सगळ्यांनाच यामुळे लस घेणे सोयीस्कर होईल, असेही दांडेकर यांनी म्हटले आहे. प्रशासनाने याबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर प्रभागनिहाय लसीकरण सुरू करावे, अशी मागणी स्वाती दांडेकर यांनी केली आहे.