खेड : गेले ४ दिवस सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील कुळवंडी गावादरम्यानची मोठी दरड रस्त्यावर कोसळली आहे़ यामुळे या भागातील तिसंगी, बिजघर, खोपी, शिरगाव आणि धामणंद गावाकडील जवळपास १८ गावांकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.खेड शहरामध्ये मासळी आणि मटण मार्केटमध्ये जगबुडी नदीचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे़ तसेच नारिंगी नदीचे पाणी रस्त्यावर मोठया प्रमाणात आल्याने दापोली ते खेड मार्ग रविवारी रात्रीपासूनच बंद झाला. मात्र सोमवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने दुपारनंतर हे पाणी ओसरले आणि हा मार्ग खुला करण्यात आला़ खेडमध्ये झालेल्या सलग ४ दिवसातील अतिवृष्टीमुळे कशेडी घाटामध्ये रविवारी दरड कोसळली होती. ही दरड आता बाजूला करण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत सुरू आहे. खेडमधील जगबुडी आणि नारिंगी नदी यांनी धोक्याची पातळी गाठली असून खेड नगर परिषदेने नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. सोमवार पहाटेपासूनच शहरातील मासळी आणि मटण मार्केटच्या इमारतीलगत पाणी आल्याने भीती निर्माण झाली होती. तसेच हे पाणी शहरात घुसल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगली होती. सोमवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाने दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतल्याने दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील भरलेले पाणी ओसरले तर नारिंगी नदीचे पाणीदेखील ओसरायला सुरूवात झाली.सोमवारी कुळवंडीमध्ये सकाळी ९.३० वाजता दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे तिसंगीसह जवळपास १८ गावाकडील दळणवळण यंत्रणा बंद पडल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती़ मात्र तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर ही दरड बाजूला करण्यात कामगारांना यश मिळाले आहे. तोपर्यंत पर्यायी असलेल्या धामणंद मार्गाकडून ही वाहतूक वळवण्यात आली. दिवसभर ही दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते तर लोटेनजीकच्या पीरलोटे परिसरातही ही दरड कोसळली आहे. रविवारी रात्री सुकिवली आणि भरणे या गावांना जोडणाऱ्या चोरद नदीवरील पुलावरून पाणी गेल्याने इकडील ४० गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारी दुपारनंतर हे पाणी पुर्ण ओसरल्याने वाहतूक पुर्ववत झाली. तसेच कशेडी घाटात शनिवारी आणि रविवारी कोसळलेल्या दरड हटविण्यात आल्यानंतर सोमवारी वाहतूक पूर्ववत झाली आहे. यामुळे वाहतुकीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले. याशिवाय खोपी-धामणंद रोडवरील पगडेवाडी आणि सुतारवाडीदरम्यान रस्त्यावर डोंगर कोसळल्याची घटना घडली आहे. (प्रतिनिधी)
खेडमध्ये दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच
By admin | Updated: June 23, 2015 00:44 IST