राजापुरातील १३ ग्रामपंचायतींना दक्षतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:31 AM2021-05-16T04:31:17+5:302021-05-16T04:31:17+5:30

राजापूर : ताैक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका प्रशासन सतर्क झाले असून, तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या १३ ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना ...

Vigilance notices to 13 Gram Panchayats in Rajapur | राजापुरातील १३ ग्रामपंचायतींना दक्षतेच्या सूचना

राजापुरातील १३ ग्रामपंचायतींना दक्षतेच्या सूचना

Next

राजापूर : ताैक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका प्रशासन सतर्क झाले असून, तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या १३ ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १३ अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, ग्रामपंचायत पातळीवरही विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.

तालुक्यातील राजवाडी, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, सागवे, अणसुरे, जैतापूर, माडबन, कशेळी, वाडापेठ, कुवेशी, दळे या १३ ग्रामपंचायती समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने या भागातील सर्व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये मागील दोन दिवसांत विशेष बैठका घेऊन स्थानिक पातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामकृतीदल यांच्याशी चर्चा करण्यात आल्या असून ग्रामपंचायत पातळीवर तातडीच्या मदतीसाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. तर तालुका पातळीवर १३ नोडल अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कच्च्या घरात राहणाऱ्या ग्रामस्थांना पक्क्या घरात स्थलांतरित करतानाच आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने नियोजन केल्याचे वराळे यांनी सांगितले. त्या - त्या ग्रामपंचायतींमध्ये पट्टीच्या पोहणाऱ्यांची यादी, अत्यावश्यक साहित्य असणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे़ तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा व अन्य सेवा सुविधा पुरविण्याबाबत विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली़.

तालुक्यात समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या सागवे, कातळी, माडबन, आंबोळगड, वाडापेठ या भागांकडे विशेष लक्ष राहणार असून, या १३ ग्रामपंचायतीतील सर्व अत्यावश्यक सेवेतील घटकांचा एक व्हाॅटसअ‍ॅप ग्रुप तयार करून वादळ परिस्थितीच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्या त्या भागातील मंडल अधिकारी, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी संभाव्य वादळाचा धोका लक्षात घेता सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे़

Web Title: Vigilance notices to 13 Gram Panchayats in Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.