मंडणगड : तालुक्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहकार्याने भिंगळोली येथील बहुद्देशीय इमारतीत सुरू करण्यात आलेले विघ्नहर्ता कोविड सेंटर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळेच उभे राहिल्याचे माजी आमदार संजय कदम यांनी सांगितले. विघ्नहर्ता कोविड रुग्णालयास राष्ट्रवादीतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्यांचे लोकार्पणाप्रसंगी ते बाेलत हाेते.
कदम पुढे म्हणाले की, कोविड सेंटर सुरू करण्यासाठी येथील महेश गणवे यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा, बेड्स, गाद्या, सॅनिटायझर, औषधे, रुग्णांना वाफ घेण्यासाठी व्हेपरायझर स्ट्रीमर मशीन यासोबतच ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे असताना विद्यमान आमदार आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून अपुऱ्या माहितीच्या आधारे न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. बहुद्देशीय केंद्राची इमारत व त्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता मी आमदार असताना जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. असे असताना उद्घाटनाच्या नामफलकावर विद्यमान खासदार सुनील तटकरे व विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांचा कुठलाही नोमोल्लेख न करता शिवसेना पक्षातील पक्षीय पदाधिकाऱ्यांची नावे पाटीवर टाकण्यात आली आहेत. म्हाप्रळ - आंबेत जेटीच्या उद्घाटनावरून खासदारांवर हक्कभंग आणण्याचे सूतोवाच करणाऱ्या विद्यमान आमदार योगेश कदम यांनी स्वतः केलेल्या कृतीमुळे इतरांचा हक्कभंग झाला आहे याची जाणीव नाही, असा टोलाही संजय कदम यांनी लगावला.
संजय कदम पुढे म्हणाले की, विद्यमान आमदार कोरोनाच्या दोन्ही लाटेत मतदारसंघातून गायब आहेत. ते कोणता आढावा घेतात त्यांनाच माहीत. मतदारसंघातील लोक आजाराने मरत आहेत, लसीचा तुटवडा आहे, लसीकरण अभियान संथ गतीने सुरू आहे. कोविड रुग्णालयात विविध साधनसामग्रीचा अभाव आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी या नात्याने ते कधी लक्ष देणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित करताना दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे फुकटेच श्रेय लाटण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, प्रकाश शिगवण, वैभव कोकाटे, नितीन म्हामुणकर, दीपक घोसाळकर, डॉ. आशिष जाधव, डॉ. अक्षय पाटणकर, हरेश मर्चंडे, सर्फराज चिपोलकर, मोबीन परकार, इम्रान महाडिक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------------------------
मंडणगड शहरातील विघ्नहर्ता कोविड रुग्णालयास राष्ट्रवादीतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्याचे लोकार्पण माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले.