दापोली तालुक्यातील टाळसुरे गावातील महिलांनी एकत्र येऊन श्रीराम महिला बचत गटाची स्थापना केली आहे. या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळून महिला आत्मनिर्भरतेकडे वळल्या आहेत. बचत गटातील सर्वच महिला शेतमजूर असल्याने कष्टकरी हाताला रोजगार मिळावा, या उद्देशाने भाजीचा मळा व फळप्रक्रिया उद्योग असे दोन उपक्रम या बचत गटाने हाती घेतले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंपूर्णतेकडे वळल्या आहेत.तालुक्यात बचत गटाची चळवळ चांगलीच फोफावू लागली असून, ग्रामीण भागातील महिलांनासुद्धा रोजगार, व्यवहार, बचत या गोष्टी ज्ञात होऊ लागल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांना गावातच रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शासनाकडून बचत गटांना अर्थसहाय्य देण्यात येते. बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण देऊन विविध लघु उद्योगांसाठी प्रोत्साहित केले जात आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक देवाणघेवाणीची बरीचशी माहिती अवगत होऊ लागली आहे. कालपर्यंत ज्या महिला केवळ पुरुषी सत्तेच्या अधिपत्याखाली काम करत होत्या, त्याच महिला आता बचत गटाच्या माध्यमातून भांडवलदार व व्यावसायिक बनू पाहात आहेत. बचत गटांचा खरा उद्देश सफल होत असल्याचे यावरून दिसत आहे. टाळसुरे गावातील श्रीराम महिला बचत गटाची स्थापना १७ डिसेंबर २००७ रोजी झाली. बचत गटाची स्थापना झाल्यावर गावातील कष्टकरी महिला एकत्र आल्या. सुरुवातीला या महिला बचत गटातील महिलांनी दापोली कोकण कृषी विद्यापीठात जाऊन शेतीविषयक व फळप्रक्रिया उद्योगाविषयी माहिती घेतली. सर्व महिला शेतमजूर असल्याने शेतीविषयक व फळप्रक्रिया उद्योगाविषयी माहिती चांगल्याप्रकारे आत्मसात केली गेली. श्रीराम बचत गटाच्या समन्वयक मृणाली मिलिंद थोरे यांच्या पुढाकाराने दापोली नवभारत छात्रालयातील फळप्रक्रिया उद्योग केंद्राला भेट देऊन फळप्रक्रिया उद्योगासंदर्भातील प्रशिक्षण घेण्यात आले. कृषी विद्यापीठ व नवभारत छात्रालयाचा या बचत गटाला चांगला फायदा झाला. टाळसुरे येथील दोन एकर भाड्याची शेती घेऊन यामध्ये भाजीपाला लागवड करण्यात आली. कारली, भेंडी, पडवळ, काकडी, दुधी, चिबूड, पावटा, चवळी, मुळा, माट अशा सामुहिक शेतीतून कष्टकरी शेतमजूर महिलांनी स्वत:चा रोजगार स्वत:च निर्माण केला.फळप्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन कोकम सरबत, आंबा पोळी, फणसपोळी, तळलेले गरे, लोणचे, करवंद सरबत, विविध पदार्थ बनवून विक्री केली जात आहे. महिला बचत गटामुळे महिलांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.प्रगतीकडे झेपावणाऱ्या या या बचत गटाच्या अध्यक्षा स्वेता लाले, उपाध्यक्ष वैशाली लाले, सचिव अनिता लाले, जयवंती लाले, भाग्यश्री लाले, मयुरी मळेकर, भाग्यर्थी गणपत लाले, सुलोचना चोगले, रंजना लाल - समन्वयक मृणाल थोरे विशेष परिश्रम घेत आहेत.शिवाजी गोरे,दापोलीश्रीराम महिला बचत गट, टाळसुरेश्रीराम महिला बचत गटाने टाळसुरे येथील दोन एकर जमीन भाड्याने घेऊन यामध्ये भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. ही लागवड केल्यानंतर फळ प्रक्रिया उद्योग उभा केला. त्यातून आर्थिक सहाय्य मिळू लागले. या बचत गटाने हळूहळू आपल्या कामाची व्याप्ती वाढवून अधिक लाभ कसा मिळविता येईल, हे पाहिले. या बचत गटामध्ये कष्टकरी महिलांना एकत्र करण्यात आले. यामुळे येथील कष्टकरी महिलांना गावातच उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध झाले आहे. बचत गटाच्या माध्यमातून कष्टकरी हाताला आता रोजगार मिळाला आहे. या रोजगाराच्या माध्यमातून या महिलांनी आपल्या कुटुंबांचा चरितार्थ चालविण्यास सुरुवात केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मदत झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान मिळत आहे.
शेताच्या मळ्यात फुलली यशाची भाजी
By admin | Updated: September 24, 2015 23:56 IST