रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला एकच दिवस पुरेल इतका लसींचा साठा असल्याने शनिवारपासून जिल्ह्याचे लसीकरण बंद करावे लागणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्ह्याचा काेरोनाबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी लसीकरणाबाबतची माहिती पुढे आली. केंद्र शासनाने राज्य शासनाकडे लसीचा साठा दिल्यानंतरच पुन्हा लसीकरण सुरु होणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी आढावा घेण्यात आला त्यावरुन केवळ शुक्रवारपुरते ८३२ डोस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिल्लक होते. त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य विभागाकडून शनिवारपासून लसीकरण थांबवावे लागेल आणि लसीकरणाची मोहीम लस आल्यानंतरच सुरु करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे, असे सामंत म्हणाले.
केंद्र शासनाकडून राज्यांना लस वाटप करण्याचा चार्ट आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांना लस किती दिली आहे. त्यावरुन केंद्र सरकार लसीचा पुरवठा कुठे जाणीवपूर्वक करतेय की कुठे जाणीवपूर्वक करत नाही, हे सिध्द झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे की, महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लस देण्याची क्षमता आहे. ती ६० लाख करण्यापर्यंत नेऊ शकतो. त्यामुळे राज्याला ४० लाख लस उपलब्ध करुन द्या, असे त्यांनी सांगितले असल्याने यावर केंद्र सरकार येत्या दोन दिवसात काय निर्णय घेतेय, हे लवकरच समजेल, असेही ते म्हणाले.
लसीच्या वाया जाण्याबाबत सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचे लस वाया जाण्याचे प्रमाण ३ ते ३.५० टक्के आहे, तर महाराष्ट्राचे ३.२७ टक्के आहे. इतर राज्यात ते जास्त आहे. पण दुर्दैवाने सर्वांना महाराष्ट्र दिसते. बाकीची राज्य दिसत नसल्याचे सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली.