अडरे : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत खेर्डीमध्ये आमच्या सातत्याच्या पाठपुराव्याने २४ मे रोजी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू होत असल्याची महत्त्वाची माहिती ग्रामपंचायत सदस्य अभिजीत खताते यांनी दिली आहे.
यासाठी ग्रामपंचायत सदस्य बाबू शिर्के, विनोद भुरण, बाळा दाते आणि मी स्वतः तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव यांना खेर्डीच्या ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन २८ एप्रिल रोजी सर्वात प्रथम निवेदन दिले होते. त्यानंतर आमदार शेखर निकम यांच्याकडे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला आहे. आमदार शेखर निकम यांनी अतिशय कार्यकुशलतेने पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांच्याकडे संपर्क साधून पत्रव्यवहार करून आमची मागणी पूर्ण करून दिली़
या लसीकरण केंद्रासाठी दोनच दिवसांपूर्वी खेर्डी ग्रामपंचायतीमध्ये तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सर्व सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ़ संतोष दाभोळकर, डॉ़ अजित दाभोळकर, डॉ़ विनायक केतकर, खेर्डीतील सर्व डॉक्टर्स यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी खेर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असणारी जागाही ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करून देण्याचे ठरले आहे. यासाठी आवश्यक माहिती डॉ़ यतीन मयेकर यांनी दिली आहे.