आरवली : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य एस. टी.चे कर्मचारी सदैव जपत असतात. मात्र, त्याला काळिमा फासणरी घटना आज पुणे - रत्नागिरी गाडीमध्ये घडली. चिपळूण ते रत्नागिरी असा प्रवास करीत असताना मदतीचा हात वेळेत न मिळाल्याने विवेक रेवाळे (४५, मूळ गाव नाणीज, रा. रत्नागिरी, उत्कर्षनगर) या प्रवाशाचा मृत्यू झाला. रेवाळे व प्रकाश यादव (मूळ गाव मलकापूर, रा. रत्नागिरी) हे मेयर आॅर्गेनिक कंपनी, ठाणेसाठी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतात. आज चिपळूण ते रत्नागिरीदरम्यान असा प्रवास करीत होते. नेहमीप्रमाणे ते वेगवेगळ्या सीटवर बसले होते. रेवाळे यांना अस्वस्थ वाटू लागल्याची जाणीव त्यांच्या बाजूच्या प्रवाशाला झाली असताना त्यांनी याबाबत शेजार्यांना कल्पना दिली. त्यांच्या नाका-तोंडातून फेस आलेला पाहून प्रकाश घाबरला. त्याने एस. टी. चालकाकडे मदतीची याचना केली. विवेकला रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली. मात्र, या चालक -वाहकांनी त्या दोघांना तुरळ येथे उतरण्यास सांगितले. ग्रामस्थांनी जवळ रुग्णालय असल्याची कल्पना चालक - वाहकांना देऊनही या दोन्ही प्रवाशांना तुरळ येथे उतरवून गाडी निघून गेली. या दरम्यान तुरळ येथे रिक्षा उपलब्ध नव्हती. थोड्या वेळाने रिक्षा उपलब्ध झाल्यावर रिक्षाचालक शैलेश शिंदे याने ग्रामस्थांच्या मदतीने विवेकला कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, त्यापूर्वीच विवेकची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची खबर मिळताच मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, शिवसेना उपविभाग अध्यक्ष वसंत उजगावकर यांनी रुग्णालयात धाव घेतली व झाल्या प्रकाराची कल्पना दूरध्वनीवरुन विभाग नियंत्रक देशमुख यांना दिली. देशमुख यांनी संताप व्यक्त करीत चालक - वाहकांवर तत्काळ कारवाई करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
मदतीअभावी प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू
By admin | Updated: May 31, 2014 01:18 IST