चिपळूण : शहरातील नगर परिषदेच्या दवाखान्यातील प्रसुतीगृह गेली १२ वर्षे बंद असून, सर्वसामान्य महिलांना प्रसुतीसाठी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. प्रसुतीगृह सुरु करण्याबाबत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकही गप्प असल्याने, असंख्य कुटुंबांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.चिपळूण नगर परिषद ही जिल्ह्यातील श्रीमंत नगर परिषद म्हणून गणली जात आहे. विविध करांच्या माध्यमातून नगर परिषदेला आर्थिक उत्पन्न मिळत असते. येथील दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करुन, देण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक राजेश देवळेकर यांना उपोषणाचा इशारा द्यावा लागला. गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी येथील दवाखान्याला कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी देण्यात आला. मात्र, या महिला वैद्यकीय अधिकारीही प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत. सध्या डॉ. प्रिती शिंदे या प्रायोगीत तत्त्वावर दवाखान्यात काम करीत आहेत.नगर परिषद दवाखान्यात किरकोळ आजारांवर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, येथील महिला प्रसुतीगृह गेली अनेक वर्ष बंदच आहे. प्रसुतीगृहात लहान मुलांना डोस पाजणे व गरोदर महिलांची तपासणी करणे एवढेच काम सुरु आहे. डेरवण रुग्णालयाच्या सहकार्याने महिलांना योग्य मार्गदर्शन देण्याचे काम जरी येथे केले जात असले, तरी प्रसुती गृह बंद असल्याने सर्वसामान्य महिलांना शेवटच्या क्षणी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. प्रसुतीगृह सुरु करण्यासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्गही अपुरा आहे. नगर परिषद दवाखान्यात अत्याधुनिक असे महिला प्रसुतीगृह असणे महत्त्वाचे आहे. यासाठी, सत्ताधारी व विरोधी नगरसेवक यांची मानसिकता बदलल्यास येथे गरोदर महिलांना योग्य सेवासुविधा मिळू शकतील. आरोग्य व वैद्यकिय समितीच्या सभापतीपदी रुक्सार अलवी यांची निवड करण्यात आली असून, महिलांच्या व्यथा काय असतात याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे, त्यांनी पुढाकार घेऊन बंद असलेले प्रसुतीगृह सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा महिला वर्गातून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)शहराच्या प्रश्नांवर तरी एकत्र लढा !चिपळूण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाबद्दल वेळोवेळी नाराजी व्यक्त करण्यात येत असते. दवाखान्यात रूग्ण वाढले, परंतु येथे आवश्यक त्या सुविधांचा अभाव असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करून घेण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला होता. त्यानंतर हे पद मिळाले. सध्या दवाखान्यात डॉ. प्रीती शिंदे या काम करत आहेत.
बारा वर्ष प्रसुतीगृह बंद
By admin | Updated: February 10, 2015 00:28 IST