रत्नागिरी : नगरपालिकेच्या व्यापारी गाळ्यांचे सव्वादोन कोटींचे भाडे थकविल्याप्रकरणी पालिकेने आज, बुधवारी पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर येथील १२ गाळे सील केले. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून, अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या गाळ्यांचे थकीत भाडे भरल्यानंतरच ताबा देणार असल्याची भूमिका पालिकेने घेतली.या गाळ्यांवरील कारवाईबाबत पालिकेचा मालमत्ता विभागच चालढकल करीत असल्याची पालिकेतील सत्ताधारी गटातील नगरसेवकांचीच तक्रार होती. कधी पोलीस बंदोबस्त मिळत नाही हे कारण, तर कधी अन्य कारणे त्यासाठी दिली जात होती. कारवाईतील दिरंगाईबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या व आज हे १२ गाळे सील करण्यात आले. सकाळी ११.३० वाजता व्यापारी गाळे सील करण्याच्या कारवाईस सुरुवात झाली. या कारवाईत पालिकेचे सहायक मिळकत व्यवस्थापक मनीषकुमार बारये, सहायक करनिरीक्षक अश्विनी वरवडेकर, पालिका कर्मचारी किरण मोहिते, प्रथमेश शिवलकर व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही होता. कारवाईच्यावेळी काही दुकानदारांना नाशिवंत माल बाहेर घेण्यास मुभा देण्यात आली. त्यानंतर गाळे सील केले. मात्र, काही गाळ्यांना दोन शटर्स असताना एकाच शटरला सील करण्यात आले. केवळ दोन गाळ्यांनाच दोन्ही शटर्सना सील करण्यात आले.(प्रतिनिधी)
पालिकेची बारा गाळ्यांवर टाच
By admin | Updated: July 3, 2014 00:36 IST