मंडणगड : हळद पीक हे मंडणगड तालुक्यासाठी नवीन असूनही येथील शेतकऱ्यांनी छान मेहनत केली आहे. हळद हे खादाड पीक असल्यामुळे या मेहनतीला खतांची जोड हवी, अशी सूचना कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रा. डाॅ. प्रफुल्ल माळी यांनी केली. यावेळी स्पेशल कोकण-४ हळदीचे वाण विकसित करणारे सचिन कारेकर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या.
मंडणगड पंचायत समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत तालुक्यातील हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेताला डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे उद्यान विद्याविभागाचे शास्त्रज्ञ डाॅ. प्रा. प्रफुल्ल माळी, स्पेशल कोकण-४ हळदीचे वाण विकसित करणारे आबलोली (ता. गुहागर) येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
हळद लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात गवत येते, त्यावर उपाययोजना म्हणून घट्ट व गादीवाफ्यावरील तीन रांगेत लागवड करण्याचा प्रयोगही शेतकऱ्यांनी करावा, असे प्रफुल्ल माळी यांनी सांगितले. हळद हे प्रचंड खादाड पीक असल्यामुळे त्या प्रमाणात रोपांना खताची आवश्यकता असते. अजूनही वेळ गेलेली नाही. सेंद्रिय लागवडीसाठी जिवामृत व सेंद्रिय-रासायनिक एकात्मिक पद्धतीने लागवडीमध्ये पाण्यात विरघळणारे औषध व सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये (सिक्वेल/रेमेडी) इत्यादी खताची आळवणी करा, अशा सूचना सचिन कारेकर यांनी केली. खत देताना कमतरता करू नका, अन्यथा उत्पादन व खर्च याची सांगड बसणे कठीण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कुंबळे येथील शेतकरी सुरेश लोखंडे यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या हळदीची एकसारखी व चांगली वाढ झाल्याबद्दल सुभाष लोखंडे यांचे कौतुक केले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती स्नेहल सकपाळ, जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, पवन गोसावी, सचिन गुरव, कुंबळचे सरपंच किशोर दळवी, ग्रामपंचायत सदस्य व रोपवाटिकाधारक समीक्षा लोखंडे, ग्रामसेवक शरद बुध, संदेश लोखंडे, पालवणीच्या ग्रामपंचायत सदस्य सारिका गुजर, मनोहर गुजर, सुभाष लोखंडे, भारती शिंदे, सुभाष लोखंडे, संदीप सोंडकर, राजेश मर्चंडे उपस्थित होते.
--------------------
अन्य हळद लागवडींची पाहणी
मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथील सरपंच किशोर दळवी, सुभाष लोखंडे, सुरेश लोखेडे, दुधेरे आदिवासी वाडी-कादवण येथील संदीप सोंडकर, कोंझर येथील संतोष गोवळे, राजेश मर्चंडे, पालवणी येथील मनोहर गुजर, सोवेली येथील आमदार याेगेश कदम यांच्या हळद लागवडीच्या प्लाॅटला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.