मंडणगड : पंचायत समिती, मंडणगडच्या हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दुधेरे आदिवासीवाडी येथील दुर्गामाता बचत समूहातील महिलांनी एकत्र येत सुमारे १५ गुंठे क्षेत्रावर हळद लागवड केली आहे.
या लागवडीसाठी एसके-४ जातीच्या हळकुंडापासून तयार केलेल्या ३,७५० रोपांची लागवड केली आहे. दोन रांगेतील अंतर ३ फूट व दोन रोपांतील अंतर १ फूट अशा पद्धतीने लागवड करून सुरूवातीला लागवडीच्या वेळी सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर करण्यात आला आहे. लागवडीनंतर एक-सव्वा महिन्यानंतर भरखत घालणे, कीडरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपाययोजना करणे, याबाबतचे यावेळी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
हळदीवरील कंद माशी, पाने गुडाळणारी अळी, करपा इत्यादी कीडरोगांची माहिती देऊन यापासून प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी क्लोरोपायरीफाॅस व कार्बनडायझीम या औषधांची फवारणी व आळवणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच युरिया या खताची रिंग पद्धतीने मात्रा देण्याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याचवेळी रोपांची लागवड केल्यानंतर १ महिन्यांनी घ्यावयाची काळजी, बेनणी, निंदणी करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
पंचायत समितीचे कृषी अधिकारी विशाल जाधव, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, पवन गोसावी यांनी यावेळी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामसेविका दरिपकर, बचतगट समूहाच्या अध्यक्ष सुषमा पवार व शेतकरी गोपाळ पवार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.