सुभाष कदम - चिपळूण -कोरडवाहू शेती ही सिंचनाच्या सीमित सुविधांमुळे शेतकऱ्यांना न परवडणारी ठरत असली, तरी अशा शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या कोरडवाहू शेती अभियानात चिपळूण तालुक्यातील पिंपळी गाव निवडल्यामुळे अशा शेतीला आता कोकणात प्रोत्साहन मिळणार आहे. अवर्षणप्रवण क्षेत्र व हलकी जमीन यामुळे कोरडवाहू शेती ही अत्यंत जिकरीची व जोखमीची झाली आहे. खरीप पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, रब्बी पीक प्रात्यक्षिके, शेतकरी अभ्यास दौरे, कर्मचारी प्रशिक्षण, शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे व गटप्रमुखांचे प्रशिक्षण इत्यादी घटकांची अंमलबजावणी सुरु आहे. पिंपळी बुद्रुक गावालगत कॅनॉल आहे. त्यामुळे या भागात बारमाही पाणी असते. येथील शेतकऱ्यांना शेतीच्या माध्यमातून आर्थिक लाभ व्हावा, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. मूलस्थान जलसंधारणासह साखळी बंधारे, शेततळे यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर करुन सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे, यांत्रिकीकरणाद्वारे उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढवणे, शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी नियंत्रित शेती, कृषी प्रक्रिया व पणन सुविधा निर्माण करणे, कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, शेतकरी गट स्थापना, प्रशिक्षण, शेती शाळा, अभ्यासदौरे यांच्या माध्यमातून मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करणे असा या धोरणाचा हेतू असून, त्यादृष्टीने अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करताना अल्प व अत्यल्प भूधारक, तसेच महिला व मागासवर्गीय शेतकरी यांना प्राधान्य देणे, शेतकरी गटामध्ये सहभागी होऊन गट आधारित उपक्रम राबविण्यास तयार असलेले शेतकरी, मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करणारे शेतकरी, सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण पद्धत अवलंब करण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड होऊ शकते. निवड झालेल्या शेतकऱ्यांना कर्मचारी प्रशिक्षण, शेतकरी गट तयार करणे, शेतकरी गट प्रमुखांचे प्रशिक्षण, शेतीशाळा, शेतकरी अभ्यास दौरा, साखळी सिमेंट नालाबांध, पाईप पुरवठा, डिझेल वा विद्युत पंप पुरवठा, शेततळ्यांचे विस्तारीकरण, सूक्ष्म सिंचन, मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरण, कोरडवाहू वाणाची पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, हरितगृह उभारणी, शेड नेट हाऊस उभारणी, दालमिल, भरडधान्य प्रक्रिया सयंत्र, प्लास्टिक स्के्रट, पॅकहाऊस, कृषी मालासाठी वाहन सुविधा, प्रशासकीय संकीर्ण अशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पिपंळी येथे या कामाची सुरूवात झाली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे व कृषी अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाला सुरूवात झाली आहे. योजना राबविण्यासाठी मंडल कृषी अधिकारी एम. आर. धोत्रे, कृषी पर्यवेक्षक एन. एन. बोडके, कृषी सहाय्यक एल. डी. शिंदे कार्यरत आहेत.
कोरडवाहू शेती अभियानातून कायापालट
By admin | Updated: January 14, 2015 23:38 IST