रक्तदान शिबिर
दापोली : तालुका भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन डेरवण येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रक्तपेढी यांच्या सहकार्याने राधाकृष्ण मंदिर सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
बस विस्तारित करण्याची मागणी
दापोली : आगारातून पाजपंढरीसाठी सुटणाऱ्या बस आंजर्ले राममंदिरापर्यंत विस्तारित करण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे यांच्याकडे केली आहे.
मासेविक्रेत्यांची गैरसोय दूर
दापोली : शहरात मासे विकण्यासाठी मच्छीमार समाजातील भगिनींना येणारी अडचण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाजन यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांची भेट घेऊन दूर केली. त्यामुळे मासळी विक्रेत्यांनी याबाबत आभार व्यक्त केले आहे.
भात बियाणे उपलब्ध
चिपळूण : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने खरीप हंगामाकरिता भात बियाणे मागविले होते. या बियाणांच्या विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. २४२५.६५ क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असताना १८०३.०३ क्विंटलची विक्री झाली. ६२२ टन बियाणे शिल्लक आहे.
काँग्रेसचे आंदोलन
रत्नागिरी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन कार्यालयासमोर ‘सात वर्षे अपयशाची, जनतेवरील अन्यायाची’ केंद्र सरकारविरोधात काळे झेंडे लावून निषेध करण्यात आला.
रेल्वेच्या वेळेत बदल
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एर्नाकूलम जंक्शन हजरत निजामुद्दीन डेली स्पेशल (०२६१७) या प्रवासी रेल्वेगाडीच्या पनवेल व कल्याण रेल्वे स्थानकांवर पाेहोचण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार ही पनवेल स्थानकात दुपारी १२.२५ वाजता तर कल्याण रेल्वेस्थानकात दुपारी १.३० वाजता दाखल होणार आहे.
व्यापारी महासंघटनेची स्थापना
चिपळूण: शहरातील व्यापाऱ्यांनी संघटित होऊन शहर व्यापारी महासंघटनेची स्थापना केली आहे. अध्यक्षपदी माजी नगरसेवक शिरीष काटकर यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी किशोर रेडीज, उपाध्यक्ष शैलेश टाकळे, पारस ओसवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजीपाला बियाणांचे वाटप
रत्नागिरी : तालुक्यातील गोळप ग्राम पंचायतीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी गावातील २५० शेतकरी कुटुंबीयांना विविध दहा प्रकारच्या भाजीपाल्यांच्या बियाणांचे वाटप केले आहे. पावसाळी चार महिने प्रत्येक घरात स्वत:पुरती भाजी प्रत्येकाने करावी, हा उद्देश आहे.
समितीची निवड
खेड : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र या साहित्यिक, सामाजिक, धार्मिक, कला क्षेत्रांत कार्य करणाऱ्या संस्थेची कोकण विभागीय समितीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी विनाेद जाधव तर सचिवपदी रिया पवार यांची नियुक्ती केली आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
खेड : तालुक्यातील गणवाल कळंबटेवाडी येथे पुणे येथील पोलीस अधिकारी विजय आंब्रे, कविता आंब्रे व कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. लाॅकडाऊनमुळे रोजगार बुडाल्याने गरीब, गरजू कुटुंबांवर उपासमारी ओढवल्याने जीवनावश्यक साहित्य वाटपाचा निर्णय आंब्रे कुटुंबीयांनी घेतला.