दापाेली : कासवांचे गाव म्हणून पर्यटनाच्या नकाशावर आलेल्या वेळास (ता. मंडणगड) गावात कासव संवर्धनाची परंपरा आजही जपली जात आहे. काेराेनामुळे गावातील ‘कासव महाेत्सव’वर निर्बंध आले असले, तरी संवर्धनाचे काम थांबलेले नाही़. चालू हंगामात ४४ कासवांची घरटी संरक्षित करण्यात आली असून, त्यामधून २,१५० पिल्लांना सुरक्षित समुद्रात साेडण्यात आले.
रत्नागिरी वन विभाग आणि वेळास ग्रामपंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली कासवमित्र वीरेंद्र पाटील आणि देवेंद्र पाटील हे कासव संवर्धनाचे काम करत आहेत. ‘ऑलिव्ह रिडले’ जातीच्या दुर्मीळ कासवांच्या संवर्धनाची मोहीम महाराष्ट्र शासन वन विभाग व स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. या संवर्धन मोहिमेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो कासवांची पिल्ले समुद्रामध्ये सुखरूपपणे सोडली जात आहेत. त्यामुळे या समुद्र किनारपट्टीवरील दुर्मीळ होत असलेली ‘ऑलिव्ह रिडले’ ही कासव प्रजाती पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आढळत आहे.
दरवर्षी मंडणगडमधील वेळास ते राजापूर या किनारपट्टीवर हजारो कासवांची अंडी संवर्धित करून त्यातून बाहेर पडलेली पिल्ले सुखरूप पुन्हा समुद्रात सोडण्यात येतात. या मोहिमेला यश आले असून, गेली कित्येक वर्ष अविरतपणे सुरू असलेल्या या मोहिमेचे अनेकांना आकर्षण वाटत आहे. त्यामुळेच कासवांची पिल्ले समुद्रात झेपावताना पाहण्यासाठी पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यातूनच ‘कासव महाेत्सव’ची संकल्पना पुढे आली़ व कासव महाेत्सवाच्या निमित्ताने पर्यटक वेळास समुद्रकिनारी येऊ लागले. पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे हा महाेत्सव सर्वदूर पाेहाेचला आहे.
मात्र, गेल्यावर्षीपासून काेराेनामुळे कासव महाेत्सवावर निर्बंध आले आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत हा महाेत्सव भरविण्यात आला नाही़, त्यामुळे पर्यटकांना कासव महाेत्सवाचा आनंद लुटता आला नाही़. तरीही कासव संवर्धनाचे काम थांबलेले नाही. कासवमित्रांनी चालू हंगामात कासवांची ४४ घरटी संरक्षित केली असून, त्यातून २,१५० पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत. वेळास गावाने आपली ही परंपरा कायम ठेवताना कासवांची घरटी संरक्षित करण्याचे काम सुरूच ठेवले आहे.
पर्यटकांमध्ये उत्सुकता
कासव महोत्सवाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देऊन घरट्यातून बाहेर पडलेली इवलीशी पिल्ले दुडूदुडू समुद्रात झेपावतानाचा आनंद लुटतात. इवलीशी पिल्ले समुद्रात झेपावतानाचे क्षण पर्यटक आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून घेतात. त्यामुळेच किनारपट्टीवर भरविण्यात येणारा ‘कासव महोत्सव’ अलिकडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.