रहिम दलाल ल्ल रत्नागिरीग्रामीण यात्रास्थळ विकास योजनेंतर्गत ‘क’ वर्ग घोषित करण्यात आलेल्या यात्रा स्थळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून २ कोटी रुपये जिल्हा परिषदेला मंजूर करण्यात आले आहेत़ मात्र, हा विकासनिधी अपुरा असल्याने यात्रा स्थळांच्या विकासासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे़ जिल्ह्यात अनेक ठिकाणी पर्यटन स्थळे, धार्मिक यात्रा स्थळे आहेत़ या स्थळांच्या विकासासाठी शासनाने ग्रामीण यात्रास्थळ विकास योजना सुरु केली़ त्या योजनेअंतर्गत क वर्ग यात्रा स्थळांची निवड करण्यात आली आहेत़ त्यामध्ये जिल्ह्यातील १६७ यात्रास्थळांचा समावेश करण्यात आला आहे़ जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे़ गणपतीपुळे हे यात्रास्थळ असून ते प्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते़ या ठिकाणी दरवर्षी देशविदेशाचे हजारो पर्यटक भेट देतात. त्याप्रमाणे इतर पर्यटन स्थळांकडे पर्यटक आकर्षित व्हावेत, यासाठी पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे़ त्यासाठीच ग्रामीण यात्रास्थळ विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील यात्रास्थळांचा विकास करण्यात येत आहे़या योजनेअंतर्गत यात्रास्थळांमधील असलेला जोडरस्ता, पाण्याची सोय, शौचालय, भक्तनिवास बांधणे, पार्किंगची सोय आणि पथदीप अशी कामे घेण्यात येतात़ आतापर्यंत जिल्ह्यातील ६० यात्रास्थळांचा या योजनेतून विकास साधण्यात आला आहे़या योजनेतून आणखी यात्रास्थळांचा विकास करता यावा, यासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून जिल्हा परिषदेला २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ जिल्ह्यातील यात्रास्थळांची संख्या पाहता मंजूर करण्यात आलेला निधी कमी पडणार आहे़ कारण एका यात्रास्थळाची कामे मार्गी लावण्यासाठी कमीत कमी १० लाख रुपये खर्च होणार आहे़ त्यामुळे यावर्षी सुमारे २० यात्रास्थळांचा यातून विकास साधता येणार आहे़ उर्वरित कामांसाठी निधी कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ त्यामुळे हा निधी यात्रास्थळांच्या विकास कामांसाठी कमी पडणार आहे़
यात्रास्थळ विकास रखडणार
By admin | Updated: July 27, 2014 00:50 IST