देवरुख : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांनी एकजुटीने १५ ऑगस्ट राेजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, हे आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण या फेसबुक समूहाचे प्रमुख संदेश झिमण यांनी सांगितले.
गेली दोन वर्षे नेत्रावती व मत्स्यगंधा यांना संगमेश्वर रोड येथे थांबा मिळण्यासाठी या समूहातर्फे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्याला यश मिळत नव्हते. यासाठी संगमेश्वर तालुक्यातील सर्व संस्था, संघटना यांना सोबत घेऊन १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. या प्रश्नासाठी सुरेश प्रभू तसेच आमदार शेखर निकम यांनीही विशेष प्रयत्न केले. १५ ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन स्थगित करावे यासाठी कोकण रेल्वेचे अधिकारी व संगमेश्वरचे तहसीलदार यांनी बैठक आयोजित केली होती. मात्र, ११.३० वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांपैकी कोणीही तहसील कार्यालयात हजर न राहिल्याने कोकण रेल्वेचे अधिकारी निघून गेले. यामुळे यावर तोडगा निघू शकला नाही.
यावेळी संदेश झिमण, संतोष पाटणे, गणपत दाभोळकर, संतोष कांबळे, दीपक पवार, मुकुंद सनगरे, वसंत घडशी, दीपक गुरव, शांताराम टोपरे, सचिन झिमण या शिष्टमंडळाने तहसीलदार सुहास थोरात यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे अधिकारी आम्हांला न भेटताच निघून गेले याविषयी संदेश झिमण यांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदार यांच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन आपण तूर्तास स्थगित करत असल्याचे सांगितले. २ ऑक्टोबरपर्यंत याविषयात कोकण रेल्वेच्या बोर्डाकडून काहीही तोडगा न मिळाल्यास २ ऑक्टोबरपर्यंत वाट बघून पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येईल, असे झिमण यांनी सांगितले.