रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी १७ नंबरचा अर्ज भरून बसणाऱ्या बहिस्थ विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळांमार्फत रविवार दि. ११ एप्रिलपर्यंत अतिविलंब शुल्क भरून अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या एप्रिल-मे २१ च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पध्दतीने स्वीकारण्यासाठी दि. २८ नोव्हेंबर ते दि. १९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारण्यात येणार आहेत.
विभागीय मंडळांनी अर्ज स्वीकारताना त्यावर ‘सुपर लेट फॉर्म’ हा शेरा पाहूनच अर्ज स्वीकारावेत. विभागीय मंडळास प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची तपासणी दि १७ एप्रिलपर्यंत पूर्ण करावी व त्यातील पात्र, अपात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करून दि.१८ एप्रिलपर्यंत राज्य मंडळाकडे सादर करावी, अशी सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे.