संकेत गोयथळे - गुहागर -- मागील विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन आमदार डॉ. विनय नातू, भास्कर जाधव व तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात ही निवडणूक चर्चेची होती. यावेळी रामदास कदम रिंगणाबाहेर असले आणि आताच्या राजकीय स्थितीनुसार जाधव विरोधात डॉ. नातू थेट लढतील, असे चित्र दिसले तरी नीलेश राणे यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केल्याने यावेळीही गुहागर मतदारसंघ महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत खेड मतदारसंघ गायब झाल्याने भाजपचे वर्चस्व असलेल्या गुहागर मतदारसंघाची मागणी कदम यांनी केली. यातूनच युतीमध्ये वितुष्ट आले. जागा कदम यांना मिळाली व नातू यांनी श्रीधर सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली. ज्यातून युतीच्या मतांचे विभाजन झाल्याने भास्कर जाधव निवडून आले. यानंतर कदम यांचे गुहागर मतदारसंघातील धावते दोन दौरेवगळता पुन्हा ते फिरकलेच नाहीत. नातू हे सुरुवातीची तीन वर्षे राजकीय विजनवासात होते. गेले वर्षभर पुन्हा नातूंनी वाडीवस्तीवर संपर्क वाढवला आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता रामदास कदम यांनी पुन्हा गुहागर संघातून निवडणूक लढवण्याबाबत जाहीर इच्छा व्यक्त केलेली नाही. याबाबत कदम व नातूंमध्ये अंतर्गत समझोता झाल्याची चर्चा आहे. यातूनच जाधव विरोधात डॉ. नातू अशी थेट लढत होईल, असे राजकीय चित्र आहे.आता भास्कर जाधव यांना पराभूत करण्यासाठी म्हणून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे नीलेश राणे यांनी जाहीर केल्याने पुन्हा एकदा ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसू लागले आहे. जाधव राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सावर्डे येथील एका कार्यक्रमात नारायण राणे यांच्यावर टीका केली आणि तेथून जाधव विरोधी राणे असा मोठा संघर्ष झाला. यातूनच दोघांच्याही समर्थकांनी एकमेकांची कार्यालये फोडली, रास्ता रोको झाला. यानंतर काही महिने हा वाद शांत झाला होता. मात्र, तरीही एकमेकांविरोधी राजकीय द्वेष कायम होता. जाधव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूक झाली. यावेळी सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांना भडकवण्याचे काम जाधव यांनी केल्याने आपला पराभव झाल्याचा राणे यांचा आरोप आहे. तालुक्यात काँग्रेस नेतृत्वहीन होती. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत नारायण राणे यांनी गुहागरकडे विशेष लक्ष देणार असल्याचे जाहीर केले होते. पण, तसे झाले नाही. आता राणे यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली.माजी खासदार नीलेश राणे गुहागरातून अपक्ष लढणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.रामदास कदम यांनी गुहागरातून निवडणूक लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केलेली नाही.जाधव विरोधात नातू लढत होण्याचे संकेत.
गुहागर मतदारसंघ यावेळीही चर्चेचाच
By admin | Updated: August 18, 2014 21:37 IST