रत्नागिरी : पसंतीनुसार जेवण न बनविल्याच्या रागातून पत्नी, सासू आणि मेहुण्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याचा सुमारास रत्नागिरी तालुक्यातील कसोप येथे घडली. याप्रकरणी पती विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनकुमार पांडुरंग देसाई (वय ५०, रा. कसोप, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नी श्रावणी अश्विनकुमार देसाई (४०, रा. कसोप, रत्नागिरी) हिने तक्रार दिली. त्यानुसार, शनिवारी रात्री अश्विनकुमारने दारू पिऊन घरी आल्यावर तिच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जेवण मागण्यास सुरुवात केली. त्यावर तिने जे बनवले आहे ते गरम करून देते, असे सांगितले. याचा राग आल्याने अश्विनकुमारने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून वाडीतच राहणारी तिची आई आणि भाऊ तिथे आले. तेव्हा बाजूची शिग उचलून त्याने श्रावणीला मारली. दरम्यान, तिची आई तिला वाचवण्यासाठी मधे पडली असता त्याने तिलाही मारहाण करून तिघांनाही ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल झोरे करत आहेत.