चिपळूण : शहरातील बाजारपेठेत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी व बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या महिलांची फार मोठी गैरसोय होत आहे. नगरपरिषद स्थापनेपासून महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने महिलावर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातील महिलाही पालेभाज्या किंवा रानमेवा घेऊन विक्रीसाठी येत असतात. तसेच अन्य बाजारहाटसाठी ग्रामीण भागातील महिलांची बाजारपेठेत वर्दळ असते. कामधंद्यानिमित्ताने महिलांची येथे ये-जा सुरु असते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एखादे स्वच्छतागृह व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून महिलावर्गातून होत आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे मंडई परिसर, शिवाजी चौक आदी भागात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतागृह व्हावे, अशी मागणी महिला संघटनांनी नगर परिषद प्रशासनाकडे दोन वर्षांपूर्वी केली असून, याबाबत केवळ आश्वासन देण्यापलिकडे काहीही कार्यवाही झालेली नाही. स्वच्छतागृह होणार, होईल, वेळ लागेल, अशी उत्तरे प्रशासनाकडून दिली जात आहेत. महिलांना विविध क्षेत्रात संधी असताना चिपळूणसारख्या शहरात एखादे अत्याधुनिक स्वच्छतागृह नसावे, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल, अशी खंत महिलावर्गातून व्यक्त केली जात आहे. स्वच्छतागृहाअभावी महिलांची होणारी गैरसोय दूर होण्याच्या दृष्टीने नगर परिषदेच्या पुढील होणाऱ्या सभेत हा प्रश्न अग्रक्रमाने घ्यावा, अशी मागणी होत आहे. निवडणूक झाल्यानंतरची सभा त्यादृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. (वार्ताहर)
चिपळुणात महिला स्वच्छतागृह नाही
By admin | Updated: October 10, 2014 23:03 IST