लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाही. मात्र, शैक्षणिक उठावांतर्गत ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनाला परवानगी दिली आहे. त्यानुसार ऑनलाईन अध्यापन मात्र सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेच्या २,५७४ शाळांपैकी जेमतेम १०० शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित शाळांतील शिक्षक स्वखर्चाने इंटरनेटचा वापर मुलांना अध्यापनासाठी करत आहेत. झूम, गुगल मीटसारख्या ॲपचा वापर करून अध्यापन करण्यात येत आहेत.
ज्या शाळांची पटसंख्या चांगली आहे, शैक्षणिक उठाव चांगला आहे, त्या शाळांनी इंटरनेट सुविधा उपलब्ध केली आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत सादिल योजनेतील ४ टक्के रक्कम इंटरनेटसाठी खर्च करण्याची परवानगी आहे. त्यानुसार काही शाळा इंटरनेटसाठी खर्च करत आहेत, बहुतांश शाळांचे शिक्षक मात्र मुलांसाठी स्वत:च खर्च करत आहेत.
.................
खासगी शाळांनी मात्र स्वत:ची इंटरनेट सुविधा उपलब्ध केली असून, शिक्षक अध्यापनासाठी शालेय इंटरनेटचा वापर करत आहेत.
गुगल मीट, क्लासरूम, झूमव्दारे अध्यापनात सुविधा जास्त असल्याने शिक्षक या सुविधांचा वापर अध्यापनासाठी करतात.
.......................
आमचे शिक्षक क्लासरूम, गुगल मीटचा वापर करून शिकवत असल्याने एखाद्या पाठाचा व्हिडीओ, पीडीएफ ओपन करून दाखवतात. शिवाय या पध्दतीमुळे फळ्यावर शिक्षक लिहितात, तेही आम्हाला पाहता येते. कमी वेळेत शिकवत असताना आमच्यासाठी विशेष परिश्रम घेतात.
- आदेन डिंगणकर, विद्यार्थी, रत्नागिरी
....................
गणिताच्या तासाला खरा कस लागतो. प्रमेय, सूत्र समजावून सांगताना शिक्षकांना विशेष परिश्रम घ्यावे लागतात. शिक्षक पाठ शिकवताना यू ट्यूबवरील व्हिडीओही दाखवतात. आम्ही मोकळ्या वेळेत यू ट्यूब किंवा दिशा ॲपवरील पाठाचा व्हिडीओ पाहतो तेव्हा आकलन सोपे होते.
- श्रेया मोरे, विद्यार्थिनी, रत्नागिरी
...................
शाळेमध्ये इंटरनेट नाही, परंतु मोबाईलचे इंटरनेट वायफायव्दारे संगणकाला जाेडून अध्यापन करताे. गुगल मीट, झूम ॲप अध्यापनासाठी उपयुक्त असून, विशेष अध्यापन सुविधा उपलब्ध आहेत. कमी वेळेत मुलांना पाठाचे आकलन होणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी गुगलव्दारे व्हिडीओ दाखवावा लागतो.
- दीपक नागवेकर, शिक्षक, रत्नागिरी
.......................
ग्रामीण भागात रेंजची समस्या जाणवते. मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी इंटरनेटकरिता खासगी मोबाईल कंपनीचा राऊटर स्वखर्चाने घेतला आहे. काही ॲपमध्ये अध्यापनासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. मुलांना कठीण विषय सोपा व्हावा, यासाठी व्हिडीओ दाखवतो. मुलांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
- पी. एल. जाधव, शिक्षक, रत्नागिरी
...................
जिल्ह्यातील ६० शाळा रेंज नसलेल्या भागात आहेत. इंटरनेट सुविधा मोजक्याच शाळांमध्ये उपलब्ध आहेत. ग्रामीण असो वा शहरी शाळेतील शिक्षक मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन अध्यापन करत असले तरी बहुतांश शाळेचे शिक्षक इंटरनेटचा खर्च स्वत: करत आहेत.
- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी