चिपळूण : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे वातावरण अतिशय शांत आहे. या निवडणुकीत राजकीय अनास्था दिसून आली. ३४पैकी १२ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, १० ग्रामपंचायतीत प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने त्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत, तर केवळ २ ग्रामपंचायतींत दोन जागासाठी मतदान होणार आहे. स्वायत्त संस्थेत निवडणुकीच्या काळात राजकीय पुढाऱ्यांकडून प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप होतो आणि गावागावात वाद निर्माण होतात. सार्वत्रिक निवडणुकीत आक्रमक असणारी ही मंडळी पोटनिवडणुकीच्या बाबतीत कमालीचे उदासीन असतात. चिपळूण तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २२ ग्रामपंचायतींतून एकही उमेदवारी अर्ज न आल्याने या जागा पुन्हा एकदा रिक्त राहिल्या आहेत. या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. जातपडताळणी प्रमाणपत्राचा फटका या जागांना बसला आहे. चिपळूण तालुक्यातील कौंढर ताम्हाणे, कळमुंडी, देवखेरकी, डुगवे, खांडोत्री, रिक्टोली, अलोरे, कुंभार्ली, अनारी, धामणवणे, निरबाडे, वालोटी, तनाळी, गोंधळे, कळवंडे, कुडप, दुर्गेवाडी, डेरवण, रावळगाव, निर्वाळ, खोपड, कालुस्ते बुद्रुक, कालुस्ते खुर्द, ढोक्रवली, कोकरे, पिलवलीतर्फ सावर्डे, पिलवलीतर्फ वेळंब, वीर, ताम्हणमळा, वडेरु, ढाकमोली, नारदखेरकी, आकले, गाणे या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १२ ग्रामपंचायतींसाठी १९ अर्ज आले होते. त्यातील दोन अर्ज अवैध ठरल्याने १७ अर्ज वैध ठरले आहेत. १० ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत. अलोरे व रिक्टोली या दोन ग्रामपंचायतींमध्ये एका जागेसाठी दोन अर्ज आल्याने तेथे ४ रोजी निवडणूक होणार आहे, तर ६ रोजी मतमोजणी होईल. निवडणूक होत असलेल्या दोन ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना गुरुवारी चिन्हवाटप करण्यात आले. तहसीलदार वृषाली पाटील, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, निवडणूक नायब तहसीलदार टी. जी. शेजाळ, नायब तहसीलदार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी काम करत आहेत. अलोरे व रिक्टोली येथे निवडणुकीला वेग आला असून, तेथे प्रचारही सुरु झाला आहे. मात्र, २२ ग्रामपंचायतींतील काही जागा पुन्हा एकदा रिक्त राहणार आहेत. (प्रतिनिधी)जातपडताळणी प्रमाणपत्र नाही ....चिपळूण तालुक्यातील ३४ पैकी केवळ १२ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तेथे निवडणुकीची थोडी धामधुम सुरू झाली आहे. स्वायत्त संस्थेत राजकीय हस्तक्षेप असू नये या मूळ हेतुलाच हरताळ फासला जात असल्याने ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीत उदासिनता दिसून येते. चिपळूण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीत एकही अर्ज न आल्यानेच या ठिकाणी जागा रिक्त झाल्याचेच चित्र पुढे आले आहे.
२२ ग्रामपंचायतींमध्ये एकही उमेदवार नाही
By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST