चिपळूण : मुंबईगोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित ठरलेल्या उड्डाणपुलावर अखेर सोमवारी पहिला स्लॅब टाकण्यात आला. या उड्डाणपुलावरील पिलरची संख्या वाढल्याने दोन्ही मार्गिका मिळून १८२ स्लॅब टाकण्यात येणार आहेत. २२० एमएम जाडीचा हा स्लॅब आहे. भर पावसाळ्यातही हे काम सुरू ठेवले जाणार आहे.गेल्या काही वर्षापासून या उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. बहदूरशेखनाका येथे उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्यानंतर पुलाच्या रचनेत बदल करण्यात आला. उड्डाणपुलाच्या पिलरची संख्या दुप्पट करण्यात आली. पहिले तयार केलेले गर्डर नष्ट करून नव्याने गर्डर तयार करण्यात आले. गेल्या काही महिन्यापासून पिलरवर पिअर कॅप उभारणीचे काम सुरू होते. दोन्ही बाजूकडून पुलाचे काम केले जात आहे. मेहता पेट्रोल पंपाजवळून उड्डाणपुलावर शटरिंगचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर सोमवारी स्लॅब टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली.या उड्डाणपुलाच्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा दोन्ही बाजूस स्वतंत्रपणे स्लॅब टाकण्यात येत आहे. त्यामुळे १८४० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलावर एकूण १८२ स्लॅब टाकले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुलाच्या पिलरच्या मध्ये ४० मीटरचे अंतर होते. मात्र नव्या रचनेत २० मीटर अंतरावर पिलर टाकल्याने त्याची संख्या वाढली. भर पावसाळ्यात या उड्डाणपुलाचे काम सुरू राहणार आहे. १८४० मीटर लांबीचा हा पूल मार्गी लागल्यानंतर यावरील वाहतूक सुरू झाल्यावर डांबरी कोट टाकला जाणार आहे. आणखी ८ ते १० महिने पुलाचे काम सुरू राहण्याची शक्यता आहे.
चिपळूणच्या बहुचर्चित उड्डाणपुलावर अखेर पहिला स्लॅब, उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्यानंतर पुलाच्या रचनेत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:49 IST