संदीप बांद्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, चिपळूण (रत्नागिरी) देशादेशांतील अथवा कुटुंबातील वाद असोत, ते युद्धाने संपत नाहीत; उलट तो प्रश्न अधिक तीव्र आणि कठोर होतो. अशा वेळी चर्चेने मार्ग निघू शकतो, हे इतिहासात अनेकदा सिद्ध झाले आहे. परंतु, दहशतवाद्यांमुळे आताची जगभरातील परिस्थिती पूर्णतः बदलली असून, या हैवानी प्रवृत्तीला धडा शिकवलाच पाहिजे, अशा भावना चिपळूणचे शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्या आई भागीरथबाई शांताराम ढगळे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या.
चिपळूण तालुक्यातील मोरवणेचे सुपुत्र अजय ढगळे सुभेदार म्हणून सैन्यात होते. दोन वर्षापूर्वी भारत-चीन सीमेवर आसाममधील तैवान येथे रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या रेकी करण्याचे काम ढगळे व त्यांच्या सहकाऱ्यांकडे होते. त्या कर्तव्यावर असतानाच भूस्खलन होऊन ढगळे यांना २६ मार्च २०२३ ला वीरमरण आले.
आईने सोडले नाही गाव
शहीद अजय यांच्या आठवणीत आई भागीरथबाई ढगळे आजही सहजासहजी गाव सोडायला तयार नाहीत. त्यांचे कुटुंबीय सध्या पुणे येथे वास्तव्यास असताना त्या मात्र आपल्या वीरपुत्राच्या एकेका आठवणीला उजाळा देत गावीच थांबल्या आहेत. त्या म्हणाल्या, कोणतीही आई आपल्या दुःखाचे प्रदर्शन करत नाही. आज देशासाठी अजय वीरपुत्र, शहीद जवान असला तरी तो माझ्यासाठी मुलगाच होता. त्याच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान ठेवून पंचक्रोशीतील काही तरुण सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित होतात, हेच मातृत्वाला मिळालेले मोठे बक्षीस आहे.