निकेत पावसकर - नांदगांव - मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटीशकालीन पेठ अशी ख्याती असलेला तळेरेचा बाजार आजही अनेक समस्यांच्या गर्तेत अडकलेला दिसून येतो. सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने तळेरे बाजारातील समस्यांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. यासाठी व्यापारी संघटना व ग्रामपंचायत यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. अन्यथा आता नव्याने सुरु झालेला कासार्डेचा बाजार हा भविष्यात तळेरे बाजाराला उत्तम पर्याय ठरु शकतो, असे चित्र सध्यातरी दिसायला लागले. विशेष म्हणजे आजपर्यंत कणकवलीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्यापर्यंतचा सर्वात मोठा आठवडी बाजार अशी ओळख आहे. गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी, मच्छिमार्केट दूरवस्था, पार्किंगची गैरसोय, स्वच्छतागृहाची अस्वच्छता, पाणपोईची व्यवस्था, बाजारपेठेतील अस्वच्छता अशा विविध समस्या तशाच आहेत. आठवडी बाजारासाठी येणारे विक्रेते ठाामपंचायत कर भरत असल्याने त्यांना आवश्यक सोईसुविधा मिळाल्या पाहिजेत. महामार्गालगत बसलेल्या व्यापाऱ्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असलेली दिसून येते. तळेरे बाजारपेठेत आतल्या बाजूला जेवढे व्यापारी बसतात तेवढेच व्यापारी महामार्गालगत बसलेले असतात. सायंकाळची गर्दी असल्याने व महामार्गावरुन विविध छोट्या मोठ्या अवजड वाहनांची सातत्याने ये-जा होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. यामुळे अपघात होऊ शकतो. यासाठी अशा व्यापाऱ्यांना ग्रामपंचायतीकडून जागेची निश्चिती करुन दिली पाहिजे. सध्या असलेले मच्छिमार्केट हे पूर्णत: दुरुस्तीला आले आहे. सध्याच्या मच्छिमार्केटच्या जागेत सुसज्ज मच्छिमार्केट व्हावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. गेली अनेक वर्षे या मच्छिमार्केटची डागडुजीशिवाय काहीच करण्यात आलेले नाही. तर ओली-सुकी मासळी घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांना सध्याची जागा खूपच अपुरी पडते. मच्छिमार्केटची प्रशस्त जागा असूनही काही शासकीय प्रक्रियेमुळे मच्छिमार्केटचे काम लांबलेले समजते. तळेरे बाजाराला विविध ठिकाणाहून अनेक प्रकारचे व्यापारी मोठ्या गाड्या घेऊन येतात. तसेच, अनेक ग्राहकही गाड्या घेऊन बाजाराला येत असतात. या सर्व गाड्या पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे अनेकवेळा मोठ्या गाड्या महामार्गालगत इतरत्र लावल्या जातात. यामुळेही वाहतूक कोंडी होतेच शिवाय, अपघात होण्याची भिती निर्माण होते. बाजारपेठ, महामार्गालगत, स्मशानभूमी रस्त्यालगत व मच्छिमार्केटच्या मागे अक्षरश: कित्येक महिन्यांपासून घाण साठल्याचे दिसून येते. विविध भागातील लांब पल्ल्यावरुन ग्राहक येत असतात, त्यातही विशेषत: महिलांचा जास्त सहभाग असतो. त्यांच्यासाठी स्वच्छ स्वच्छतागृह असले पाहिजे. भाजी विक्रेते, मटण विक्रेते व इतर व्यावसायिकांना ग्रामपंचायतीने कचरा टाकण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून दिली गेली पाहिजे. विविध हॉटेल्सच्या सांडपाणी इतरत्र सोडलेले दिसून येते. त्यामुळेही दुर्गंधी पसरते. कासार्डेचा बाजार उत्तम पर्यायतळेरे बाजारपेठेतील विविध समस्या न सुटल्यास या बाजाराला नव्याने सुरु झालेला कासार्डेचा बाजार हा उत्तम पर्याय ठरू शकतो. इतर सर्व बाबी तळेरेला असल्या तरीदेखली भविष्यात कासार्डे येथे अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या जावू शकतात. त्यासाठी आवश्यक लागणाऱ्या जमिनीचा प्रश्न सुटला पाहिजे. कारण कासार्डेत मुबलक प्रमाणात जमीन उपलब्ध आहे.
तळेरे बाजारपेठ अजूनही समस्येंच्या गर्तेत
By admin | Updated: February 2, 2015 23:44 IST