राजापूर : रिफायनरी प्रकल्पाच्या वाढत्या समर्थनामुळे प्रकल्प विरोधकांच्या पायाखालची जमीन आता सरकू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गाव पातळीवर गावकऱ्यांना हाताशी धरून प्रकल्पविरोधी पुढाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांना नारळावर हात ठेवून प्रकल्पविरोधात शपथा घेण्यास भाग पाडले जात आहे. अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविणारी गावकर मंडळी आणि पुढाऱ्यांचा शोध घेऊन पोलीस आणि प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघाचे सचिव व माजी नगरसेवक विलास पेडणेकर यांनी केली आहे.
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा पाठिंबा वाढू लागला आहे. नव्याने प्रस्तावित असलेल्या सोलगाव, देवाचेगोठणे, बारसू, गोवळ, शिवणे खुर्द परिसरातील लोकांनी या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्पविरोधी पुढारी सक्रिय झाले आहेत. काही प्रकल्पविरोधी मंडळी स्थानिक पातळीवर गावकऱ्यांना हाताशी धरून देवळात नारळ ठेवून प्रकल्पाच्या विरोधासाठी गावातील जनतेवर दबाव आणत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. पेडणेकर यांनी हे प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे नमूद केले आहे.
आमचीही देवावर श्रद्धा आहे, आम्ही देव मानणारी माणसे आहोत. मात्र, या श्रद्धेचा गैरफायदा कुणी घेत असेल तर ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आपल्या देशात आणि राज्यात अंधश्रद्धेला थारा नाही, त्यासाठी कठोर कायदेही आहेत. मात्र, असे असतानाही गावपातळीवर ही मंडळी अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेच्या मनात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत आहेत. यासाठी प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.
काही राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधीही मंदिरांमध्ये प्रकल्प विरोधी बैठका घेतात आणि देवाच्या नावावर जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न करतात, हेही यापूर्वी पुढे आले आहे. हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. तुम्हाला विकास करता येत नसेल तर किमान अशा प्रकारे जनतेमध्ये गैरसमज तरी पसरवू नका, असेही पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.