चिपळूण : बेकायदा खडी वाहतूक करणारा डंपर तहसीलदार वृषाली पाटील यांनी मंगळवारी शहरातील प्रांत कार्यालयासमोर पकडला. त्याला ३९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रविवारपासून सुरू झालेल्या या कारवाईत १ लाख ५ हजार ६०० रुपये दंड आकारण्यात आला. या कारवाईमुळे बेकायदा खडी, वाळूची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.राजू यादव हे आपल्या ताब्यातील डंपरमधून ५ ब्रास खडी घेऊन चिरणी ते चिपळूण येत असता त्यांना तहसीलदार पाटील यांनी अडविले. त्यांनी पास पाहिला असता त्यावर तारीख, वेळ व ठिकाण याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांना ३९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही रक्कम त्यांनी भरली आहे. शिरगाव येथील रवींद्र काशिराम रहाटे या वाळू व्यावसायिकाकडूनही १० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.चार दिवसांपूर्वी पोफळी येथे एक ब्रास वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला होता. खेंड येथे माती उत्खननावर कारवाई करण्यात आली होती. खडी वाहतूक २, जांभा वाहतूक ५, ग्रीट वाहतूक १, माती उत्खनन १, वाळू वाहतूक २, काळा दगड १ अशा सर्वांवर १ लाख ५ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तहसीलदार वृषाली पाटील यांनी बेकायदा खडी, वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम राबवली आहे. या कारवाईमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, ही कारवाई अशीच सुरू ठेवण्याचे धोरण तहसीलदारांनी स्वीकाराले आहे. यामुळे महसूल विभागात महसूल जमा झाला आहे. (प्रतिनिधी)या धडक कारवाईत लाखोंचा दंड आकारण्यात आला, ही माहिती लिपीक मिलिंद नानल यांनी दिली. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही ठोस कारवाई झाली.
तहसीलदारांनी ठोठावला लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2015 23:54 IST