रत्नागिरी : पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणेश गीतगायन स्पर्धेच्या लहान गटात रत्नागिरीच्या स्वरा अमित भागवत हिने प्रथम क्रमांक पटकावला. स्वरा ही रत्नागिरीतील स्वराभिषेक संगीत वर्गाची विद्यार्थिनी असून, विनया परब यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे.
गणेश गीतगायन स्पर्धा ५ ते १५, १६ ते ४५ आणि ४५ वर्षांवरील अशा तीन गटांमध्ये पार पडली. यामध्ये गणपतीची आरती, भजन, अभंग, बालगीत, उत्सव गीत, स्तोत्र आदींपैकी एकाचे गायन करून त्याचे व्हिडीओ या स्पर्धेकरिता पाठविण्यात आले होते. स्वरा जीजीपीएस शाळेमध्ये सातवीत शिकत आहे. तिने या स्पर्धेकरिता केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेले आणि पं.संजीव अभ्यंकर यांनी गायलेले गीत सादर केले.
या स्पर्धेकरिता अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, शिल्पा पुणतांबेकर, गौरी यादवडकर आणि आनंद कुरेकर आदी दिग्गजांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पहिल्या गटात ऋत्विज कुलकर्णी (बीड), तनय नाझीरकर (पुणे) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले, याशिवाय दुसऱ्या गटात दत्तहरी कदम (पुणे) आणि तिसऱ्या गटात अश्विनी सोमण (पुणे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्वराच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.