रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा बजावण्यास डॉक्टर्स तयार होत नाहीत. त्यामागे अनेक कारणे आहेत. या जिल्ह्यांच्या काही भागात शिक्षणाच्या चांगल्या सोयी पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. त्यांच्या निवास व्यवस्थेचाही प्रश्न आहे. त्यामुळे यापुढे या दोन्ही जिल्ह्यात येणार्या डॉक्टर्ससाठी वेगळ्या सुविधा, प्रोत्साहन दिले जाईल. स्पेशल इन्सेन्टिव्हही दिले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच राज्यातील अन्य जिल्ह्यातही शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांच्या रिक्त पदाची समस्या आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या काळात ही समस्या सोडविण्यासाठी आपण खास प्रयत्न करीत आहोत. शासकीय सेवेत येणारे डॉक्टर्स कमी आहेत. त्यातही राज्यात नव्हे तर देशातही डॉक्टर्सची कमतरता आहे. शासकीय सेवेत डॉक्टर्स यावेत यासाठी तीनवेळा भरती करण्यात आली. भरतीत पारदर्शकता होती. शासकीय सेवेत वेतन खासगी सेवेच्या तुलनेत कमी आहे. यासाठी या सेवेत येणार्या पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्सना ६ इन्क्रीमेंटस तर डिप्लोमा होल्डरना ३ इन्क्रिमेंटस दिल्या. कोकणात शासकीय रुग्णालयात येण्यास डॉक्टर्स तयार नाहीत, असे सांगितले जाते. त्याला काही वेगळे कारण आहे काय? असे विचारता शेट्टी म्हणाले, वेगळे कारण नाही परंतु कारणे अनेक आहेत. मुख्यत: जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा चांगल्या आहेत परंतु तेवढ्या अनेक तालुक्यांच्या ठिकाणी नाहीत. त्यामुळे डॉक्टर्स यायला नकार देतात. तसेच ग्रामिण भागात डॉक्टर्सच्या निवासाची सोयही त्यांच्या पध्दतीने सोयीची होत नाही. डॉक्टर येथे न येण्याचे हेसुध्दा कारण आहे. तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनमध्ये राजकीय कार्यकर्त्यानी हल्लाबोल केला होता या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला होता मात्र मंत्री शेट्टी यांनी अन्य कारणे देत मूळ मुद्यास बगल दिली. राज्यात यावेळी झालेल्या लोकसभा निवडणूकीत आघाडीला सपाटून मार बसला. यामागची कारणे काय आहेत, यावर बोलताना शेट्टी म्हणाले, कारणे काहीही असोत आम्ही जनतेचा कौल मान्य केला आहे. आम्ही कुठे चुकलो याचे आत्मपरिक्षण सुरू आहे. आम्ही आमच्या चुका दुरूस्त करू, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
डॉक्टर्सना ‘स्पेशल’ सुविधा सुरेश शेट्टी
By admin | Updated: May 25, 2014 01:13 IST