कुवे : दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांसाठी मात्र ती कडूच राहणार आहे. दिवाळी सणात या शिधापत्रिकाधारकांना बाहेरुन साखर खरेदी करावी लागणार आहे.शासनाची रास्तधान्य दुकाने गोरगरिबांसाठी वरदान आहेत. यापूर्वी या रास्तदराच्या दुकानांवर सणासुदीच्या काळात साखर, तेल मिळायचे. आता मात्र येथून तेल, साखर, डाळ गायब झाली आहे. दिवाळीच्या सणात धान्य मात्र दर महिन्याप्रमाणेच मिळणार आहे. जीवनावश्यक वस्तू रेशनवरुन गायब झाल्यामुळे गरिबांची दिवाळी कडू होत आहे. काही महिन्यांपासून बीपीएलधारक व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना माणसी ४०० ग्रॅम साखर मिळायची. आता तेही प्रमाण कमी झाले असून, माणसी १५० ग्रॅम साखर दिली जात आहे. त्यामुळे या साखरेवर दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे जादा लागणारी साखर सर्वसामान्य जनतेला बाहेरुन बाजारभावाने खरेदी करावी लागणार आहे. निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच दिवाळी आल्याने या निवडणुकीमुळे तरी या रास्त दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना खूश केले जाईल, अशी सर्वसामान्य जनतेची धारणा होती. मात्र, तसे काहीही न झाल्याने शिधापत्रिकाधारक नाराज दिसत आहेत. किमान दिवाळी सणापुरते तरी रेशन कार्डवर मिळणारे रॉकेल पुरेसे मिळेल, अशीही आशा कार्डधारकांना होती. मात्र, माणसी अर्धा लीटर रॉकेलवर दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल शिधापत्रिकाधारकांमधून केला जात आहे.दिवाळी सण जवळ आला तरी रेशन दुकानांवर साखरेचा पत्ता नसून, तेलही गायब आहे. त्यामुळे आता सोसायटीवाले आपल्या माध्यमातून तेलपिशव्या या रेशन दुकानांवर उपलब्ध करुन देत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)अत्यल्प साखर काय कामाची...बाहेरुन करावी लागणार खरेदी.शिधापत्रिकाधारकांना साखर कडूच.साखरेचे प्रमाण ५०० ग्रॅमवरुन १५० ग्रॅम माणसी.अर्ध्या लीटरवर दिवाळी.दिवाळी सणात या रास्त धान्य दुकानावर बाहेरुन खासगी तेल पिशव्या विक्रीस उपलब्ध.निवडणुका झाल्या तरीही शिधापत्रिकाधारक आशेवर.
खुल्या बाजारातच साखरेची खरेदी
By admin | Updated: October 17, 2014 22:58 IST