आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे रेल्वेस्थानक व्हावे, या मागणीसाठी सन २००९ पासून जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कडवई पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे प्रयत्न सुुरु होते. २०१०च्या उपोषणानंतर रेल्वेस्थानकाऐवजी या ठिकाणी थांबा मंजूर करण्यात आला. परंतु पाच वर्षे उलटूनही निधीअभावी थांब्याचे काम न झाल्याने प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ग्रामस्थांतर्फे रेल्वे रोकोचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेनंतर येत्या १५ दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.कडवई येथे रेल्वे स्थानकाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. या मागणीसाठी वारंवार आंदोलने झाल्यानंतर स्थानकाऐवजी थांबा मंजूर झाला. मात्र, या थांब्याचा प्रश्नही अजून तसाच आहे. कडवई येथे मंजूर रेल्वेथांब्याच्या या आंदोलनात पक्षभेद विसरुन सर्वांनी संघटित व्हावे, यासाठी जितेंद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्याला कडवई सरपंच बापू कदम यांच्यासह दिलावर खान, गजानन ओकटे, देवजी ओकटे, अंकुश ओकटे, राजेंद्र नांदलस्कर, मोहन ओकटे यांनी पाठिंबा देत हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. यासाठी जवळपास पन्नास लोकांची समिती स्थापन करण्यात आली होती. यामुळे तहसीलदार वैशाली माने व पोलीस निरीक्षक मोहन चिखले यांनी रेल्वे प्रशासनाकडे चर्चा करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन कडवई ग्रामपंचायत कार्यालयात क्षेत्रीय रेल्वेप्रबंधक बाळासाहेब जगताप, टी. मंजुनाथ, पोलीस निरीक्षक मोहन चिखले, रेल्वे पोलीस अधिकारी यांच्यासह आंदोलकांची सुमारे चार तास बैठक झाली.यामध्ये रेल्वे प्रबंधक बाळासाहेब जगताप यांनी २०१०ला थांबा मंजूर झाल्याचे मान्य करीत निधीअभावी हे काम झाले नसल्याचे सांगितले. याकरिता जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधीची मागणी केली असून, यासाठी लागणारा ३६ लाखाचा निधी देण्याची तयारी या दोन्ही कार्यालयांनी दाखविल्याची माहिती देताच बैठकीतील वातावरण तापले. जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नसताना जिल्हा प्रशासन निधी कसा देणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आम्हाला प्रशासनाचा निधी नको. रेल्वे प्रशासनाकडूनच निधी घेऊन १ मे रोजी या थांब्याचे उद्घाटन व्हावे, अशी मागणी करण्यात आली.यावेळी जितेंद्र चव्हाण, राजेंद्र सुर्वे, तुरळ सरपंच अरविंद जाधव, राजवाडे सरपंच संतोष घडवलकर, राजन कापडी, माधव चव्हाण, शांताराम सुर्वे यांनी आपली भूमिका मांडली. जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत रेल्वे ट्रॅकवर जमाव थांबेल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने वातावरण तप्त झाले. यावेळी नेतृत्व करणाऱ्या लोकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य उत्तर द्या, अशी मागणी केली. त्यानुसार जगताप यांनी येत्या १५ दिवसांत निधीबाबत ठोस भूमिका घेऊन रेल्वेचे व्यवस्थापक संचालक यांच्याशी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)पाच वर्षे उलटूनही निधीअभावी थांब्याचे काम थांबलेलेच.प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ग्रामस्थांतर्फे रेल्वे रोकोचा प्रयत्न.जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधीची मागणी करण्यात आल्याच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर ग्रामस्थ संतापले.१ मे रोजी थांब्याचे उद्घाटन करण्याची मागणी.
स्थानकासाठी कडवईत रेलरोकोचा प्रयत्न
By admin | Updated: January 28, 2015 00:52 IST