पाचल : मानवाच्या आयुष्याचे दोन थांबे. एका थांब्यावरुन आयुष्याचा प्रवास सुरु करायचा, तर दुसऱ्या थांब्यावर स्थिरशांती घेत निवांतपणे थांबून जायचे. या दोन थांब्यांच्या अवघ्या १५ मीटरच्या अंतरात दोन इमारती उभ्या करण्याची किमया साधली आहे ती अर्जुना प्रकल्पाच्या पाटबंधारे खात्याने.शासनाच्या मध्यम प्रकल्पामध्ये येणारा अर्जुना प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी करक व पांगरी गावे उठवून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकी करकचे मूळ गावच्या हद्दीत पुनर्वसन करण्यात आले, तर पांगरी गावचे पुनर्वसन करताना दोन ठिकाणात विभाजन झाले. त्यापैकी एक जुन्या पांगरी गावातील पठारावर आणि सध्याच्या ढाब्याच्या ठिकाणी तर निमे पुनवर्सन पाचल गावच्या हद्दीत पाचल देसार या ठिकाणी करण्यात आले. या पुनर्वसनांना सामाजिक व भौतिक गरजा पुरवण्याचे काम हाती घेण्यात आले. पुनर्वसन ठिकाणाचे सपाटीकरण करुन सुमारे ३ ते ४ गुंठे मापाचे तुकडे पाडून लोकांना देण्यात आले. या पुनर्वसनात दोन घरांच्या समोरुन जाणारे मध्यवर्ती रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यांवर केलेल्या खडीकरणानंतर अद्याप खात्याने डांबरीकरण केले नाही. आजघडीला या रस्त्यावरील खडी इतकी वर आली आहे की, माणसे सोडाच परंतु जनावरांना चालणे अवघड झाले आहे. खडी हातफोडीची असून, धारदार असल्याने माणसांच्या पायासह जनावरांच्या पायाला इजा होत आहे. सुमारे ६० ते ७० घरे या पुनर्वसनात आहेत. येथे प्राथमिक शाळेची सोय खात्याने उपलब्ध करुन दिली आहे. परंतु या शाळेकडे जाणारा रस्ता पूर्ण खडीचा असल्याने मुलांना या रस्त्यावरुन चालणे कठीण झाले आहे.पुनर्वसनातील लोकांना प्रवासाच्या ठिकाणी निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून राज्य महामार्ग १५० ओणी विठापेठ या रस्त्यावर मार्गनिवारा बांधण्यात आला, तर याच मार्गनिवाऱ्याच्या पाठीमागे १५ मीटर अंतरात निवारा बांधण्यात आला. ओणी विठापेठ रस्त्यावर असणारा हा निवारा वर्दळीच्या रस्त्यावर असला तरी इथून या निवाऱ्याच्या ठिकाणी फारशी चढ-उतार होत नसली तरी निवाऱ्याच्या पाठीमागे स्मशान शेड बांधली असल्याने थोडेसे इथे भीतीचे वातावरण तयार होते. पाटबंधारे खात्याने एकाच ठिकाणी या दोन थांबे तयार करून पुनर्वसितांची सोय केली आहे. (वार्ताहर)
अवघ्या १५ मीटरच्या अंतरात थांबे
By admin | Updated: August 9, 2014 00:35 IST