अडरे : वीज ग्राहकांना सुलभ हप्त्यात थकीत बिलांची रक्कम भरण्याची सुविधा देण्यात यावी, असे आदेश दि. १५ मार्च रोजी रत्नागिरी येथील महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी चिपळूणचे कार्यकारी अभियंता यांना दिले होते. तरीही अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून वीज बिलांच्या वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित करून वीज ग्राहकांना नाहक त्रास दिला जात आहे. याविरोधात आक्रमक झालेले मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे व पदाधिकाऱ्यांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. वीज ग्राहकांना त्रास देणे बंद करा, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
कोरोनामुळे महावितरण कंपनीच्या ग्राहकांना आपली वीज बिले भरता आली नाहीत. मात्र, या थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने धडक मोहीम हाती घेत ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली होती. या सक्तीच्या वसुलीविरोधात आंदोलनातून आवाज उठवत रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुलभ हप्त्यात वीज बिल भरण्याची ग्राहकांना मुदत द्यावी, अशी मागणी रत्नागिरी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली होती. त्यानुसार अधीक्षक अभियंत्यांनी मागणीची दखल घेत थकीत वीज ग्राहकांना सुलभ हप्त्यात वीज बिलाची रक्कम भरणा करण्याची सुविधा देण्यात यावी, असे लेखी आदेश चिपळूणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांना दिले होते. मात्र, तरीही वीज बिलांच्या वसुलीसाठी थकीत ग्राहकांवर दबाव टाकला जात आहे. तसेच अर्धी रक्कम भरूनही विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या काही तक्रारी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांच्याकडे प्राप्त झाल्या. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह थेट महावितरण कार्यालयावर धडक देत, कार्यकारी अभियंता लवेकर यांना जाब विचारला.
यावेळी, तत्काळ हे प्रकार थांबवा, अर्धे वीज बिल भरूनही ज्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे ते तत्काळ जोडून द्या, रिकनेक्शनची रक्कम गोरगरीब सर्वसामान्यांच्या माथी मारू नका, अशी मागणी केली. या मागण्यांचा विचार न झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशाराही नलावडे यांनी दिला आहे.
यावेळी मनविसे युवती तालुकाध्यक्षा अस्मिता पेढांबकर, श्रावणी चिपळूणकर, शबाना कुंभार्लीकर, शमीन कुंभार्लीकर, श्वेता खानोलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.