राजापूर : एकीकडे तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मात्र ज्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, अशा कोविड सेंटरमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची फार मोठी गैरसोय होत आहे. रायपाटण कोविड सेंटरमध्ये तर रुग्णांना पाण्याचीही व्यवस्था नसल्याने पाण्याअभावी रुग्णांची तडफड होत आहे. तेथील सेंटरमधील रुग्णांची हाेणारी परवड थांबवावी, असे मत भाजप तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांनी मांडले.
तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी त्यांना तालुक्यातील जवळच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती केले जात आहे. मात्र, त्या ठिकाणी असुविधांचा सामना रुग्णांना करावा लागत असल्याचे गुरव यांनी सांगितले. प्रशासकीय यंत्रणेला वारंवार सांगूनही रायपाटण कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पाण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. गेले कित्येक महिने कोविड सेंटरमध्ये पाण्याची बोंबाबोंब आहे. रुग्णांना दिले जाणारे जेवणही निकृष्ट दर्जाचे आहे. पुरेसे कर्मचारी नाहीत. कधी डॉक्टर नाहीत, तर कधी डॉक्टर संपावर गेले आहेत, अशी स्थिती आहे. त्यामुळे राजापूरमधील रुग्णांना शासनाने बरे होऊ द्याचे नाही, असे ठरवले आहे की काय, असा प्रश्न गुरव यांनी विचारला आहे.
राजापूर तालुक्यात पुरेशा सोयी सुविधा नसल्याने कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अशावेळी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने काही गोष्टी करणे आवश्यक असताना केवळ आपण काही तरी मोठे करत असल्याचा आव आणून जनतेच्या भावनांशी खेळू नका, अशा दिखाऊ पुढाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा टोलाही गुरव यांनी लगावला आहे.