देवरुख : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील वाहनधारकांवर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची गंभीर दखल संगमेश्वर तालुक्याचे माजी आमदार सुभाष बने यांनी घेतली आहे. त्यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून अवजड वाहनांसाठी हा मार्ग सुरळीत करावा, अशी सूचना केली.
साडवली येथे रत्नसिंधू या निवासस्थानी संगमेश्वर तालुक्यातील वाहनचालक, मालकांनी मालवाहतूक बंद असल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची व्यथा मांडली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे आंबा घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे हा मार्ग सर्व वाहनांसाठी वाहतुकीला बंद ठेवण्यात आला आहे. दीड महिन्याचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही सहाचाकी वा तत्सम माल वाहतूक करणारी अवजड वाहने साखरपा येथून पुढे जाण्यास पोलीस अटकाव करीत असल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे चिरा, लाकूड, बांधकाम साहित्य, वाहतूक ट्रक चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
वाहनचालक आणि मालक यांनी संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव तसेच चिरेमालक संघटना यांनी माजी आमदार सुभाष बने आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची भेट घेऊन व्यथा मांडली. सुभाष बने यांनी प्रथम राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अभियंता पंदूरकर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी घाट मार्ग दुरुस्तीचे काम झाले आहे. यामुळे वाहतुकीला आमच्या विभागाकडून कोणत्याही प्रकारचे बंधन नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्याकडे संपर्क साधून वाहनधारकांची नाहक अडवणूक करण्यात येऊ नये, अशी सूचना केली. जर मार्गाच्या दुरुस्तीचे काम झाल्याचा दावा संबंधित विभाग करीत आहे, तर पोलिसांना वाहतूक थोपविण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी किरण जाधव, साडवली सरपंच राजू जाधव, योगेश चव्हाण, राजेंद्र शिंदे, रमेश पंदेरे, ओंकार सुर्वे, राजन मोहिरे, गजानन पवार, प्रमोद जाधव उपस्थित हाेते.