रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांनी सॅफरॉनचा मुख्य सूत्रधार शशिकांत राणे याला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतल्यानंतर सॅफरॉन फसवणूक प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सखोल तपास केला जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी दिली. रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत शेकडो रत्नागिरीकरांना करोडो रुपयांचा चुना लावलेल्या सॅफरॉन कंपनीचा मुख्य सूत्रधार राणे याला आज, मंगळवारी सायंकाळी रत्नागिरी पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्याला आज पहाटे रत्नागिरीत आणून अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याविरोधात रत्नागिरीत आतापर्यंत ३०० तक्रारी दाखल झाल्या असून, गुंतवणूकदारांच्या फसवणुकीची रक्कम आठ कोटींपर्यंत पोहोचली आहे. पोलीस कोठडीत असतानाच्या काळात त्याची कसून तपासणी केली जाणार असून, त्यातून बरीच माहिती बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे यांनी स्वत: लक्ष घातले असून, प्रकरणाचा तपास शहर पोलीस तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे न देता यासाठी स्वतंत्र तपासणी पथक नियुक्त केले आहे. (प्रतिनिधी)लाभधारकांचीही होणार चौकशी?शशिकांत राणे याच्या लॅपटॉप व संगणकाच्या हार्डडिस्क पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्यात गुंतवणूक करून फसवणूक झालेल्यांबरोबरच योजनेचा लाभ उठवत लाखो रुपयांची कमाई करणाऱ्यांच्या कुंडल्याही सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सुरुवातीच्या लाभधारकांचीही सखोल चौकशी होणार असून, त्यांंचा आयकर भरणा तसेच त्यांनी रक्कम कोठून आणली याचीही चौकशी होणार असल्याचे संकेत आहेत.
सॅफरॉन फसवणूक तपासासाठी विशेष पथक : संजय शिंदे
By admin | Updated: July 9, 2014 23:53 IST