लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : पंचायत समिती उपसभापती निवडणूक लागण्यापूर्वीच उपसभापती पदासाठी तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांचे नाव जाहीर हाेताच, अंतर्गत वाद उफाळून आला आहे. हे नाव जाहीर करताना गटनेता म्हणून राकेश शिंदे व सहकारी शिवसेनेच्या सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आराेप करीत राकेश शिंदे यांनी आपल्या गटनेतेपदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्याकडे दिला आहे.
माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पंचायत समिती सदस्यांची बैठक घेतली होती. या बैठकीतच उपसभापती पदासाठी प्रताप शिंदे यांचे नाव जाहीर केले होते. शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी, पक्षाकडून प्रताप शिंदे हे उपसभापती पदाचे उमेदवार असतील, असे लेखी आदेश दिले होते. निवडीदरम्यान पंचायत समितीचा गटनेता असो वा उर्वरित ८ सदस्य, कोणालाही विश्वासात घेतले नाही. थेट प्रताप शिंदे यांचे नाव जाहीर करीत उपसभापती पदाच्या शर्यतीवर तोडगा काढला होता. दरम्यान, उपसभापती पदासाठी राकेश शिंदे, यांच्यासह तालुकाप्रमुख प्रताप शिंदे आणि कोंढे गणाचे सदस्य सुनील तटकरे इच्छुक होते. यातील राकेश शिंदे व तटकरे यांना दूर करीत तालुकाप्रमुखांना संधी देण्यात आली. यावरून सदस्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. तालुकाप्रमुखाविरोधात बोलणार कोण, असा विषय होता. अखेर शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर आली आहे. उपसभापती निवडीबाबत गटनेते राकेश शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. या नाराजीतून त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.