शोभना कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : लहान मुले काय काय उपद्व्याप करून ठेवतील, ते सांगता येत नाही. त्यामुळे लहान मुलांना काही वेळेसाठी एकटे सोडणे, पालकांना संकटात टाकणारे असते. म्हणूनच लहान मूल खेळत असेल तर त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून राहावे लागते. दुर्लक्ष झाले तर नाका - कानात खडू, मोती, वाटाणा आदी घालणे, श्वास नलिकेत सेफ्टी पिन घालणे, असे अनेक प्रकार करून स्वतःबरोबरच आई, वडील आणि डॉक्टरांनाही जेरीस आणतात.
नाक-कान-घसा तज्ज्ञांच्या मते, मूल रांगायला लागल्यापासून अगदी आठ ते दहा वर्षांपर्यंत मुलांना आपल्या शरीराबद्दलची उत्सुकता असते. त्यामुळे आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तू गंमतीने नाका- कानात घालणे, ही त्याची सहज प्रवृत्ती असते, परंतु श्वासनलिका, अन्ननलिकेत सेफ्टी पिन घातल्यास ते धोकादायक ठरून गंभीर शस्त्रक्रियेपर्यंत पोहोचण्यास कारणीभूत ठरते.
----------------------------
मुले काय काय करतील याचा नाही नेम
- कुणाच्या कानात खडू, तर कुणाच्या नाकात पेन्सिल
- कुणी गिळला मोती, तर कुणाच्या नाकात अडकला शेंगदाणा
- कुणाच्या श्वासनलिकेत सेफ्टी पिन - कुणाच्या अन्ननलिकेत बॅटरीचा छोटा सेल
- कोण प्याले रॉकेल, कोण प्याले फिनेल
- कुणाच्या कानात गोचीड, तर कुणाच्या कानात कीटक
-----------------------------------
अशी घ्या मुलांची काळजी
- मुलांच्या आसपास पेन्सिलसारखे टोकदार वस्तू, डाळी, कडधान्य, औषधे, कीटकनाशके ठेवू नका.
- त्यांचे कान नियमित स्वच्छ करा. नाक, कान दुखू लागल्यावर लक्ष द्या.
-पाळीव जनावरांना हाताळताना लहानांबरोबरच मोठ्यांनीही गोचिडसारखा प्राणी जाऊ नये म्हणून कानात हलकासा कापूस ठेवावा.
- घरात कीटक येतात तेव्हाही कानात कापूस ठेवावा
- मुलाची उत्सुकता वाढेल असे हानिकारक वस्तू, औषधे, कीटकनाशके दूर ठेवा
---------------------
मूल रांगायला लागतात, तेव्हा हे प्रकार वाढतात. म्हणून छोट्या मुलांच्या आसपास टोकदार वस्तू, विषारी औषधे ठेवू नका. त्यांचे कान नियमित स्वच्छ करा. नाक, कान दुखू लागल्यावर लक्ष द्या. मुलाला एकटे सोडू नका. मुलाने श्वासनलिका किंवा अन्ननलिकेत काही वस्तू अडकल्यास गंभीर शस्त्रक्रिया करावी लागते.
- डॉ. संघमित्रा फुले,
नाक, कान, घसा तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी