दापोली : कोकणी माणूस आत्महत्या करत नाही, परंतु चेष्टाही सहन करणार नाही, अशी संतप्त भावना सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर बोलताना दापाेलीतील मच्छीमार आणि बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
पोटच्या मुलाबाळांप्रमाणे सांभाळलेल्या बागा चक्रीवादळाने उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे कोकणी माणूस हतबल झाला आहे, अशा परिस्थितीत सरकारकडून दिलासा मिळण्याऐवजी तूटपुंजी मदत जाहीर झाले आहे आणि ही मदत म्हणजेच कोकणी माणसाची क्रूर चेष्टा केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मच्छीमार बागायतदार व कोकणी माणसाने व्यक्त केल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण कोकणची धूळधाण केली होती आणि या परिस्थितीतून सावरण्याआधीच पुन्हा एकदा ताैक्ते चक्रीवादळाने कोकणची मोठी हानी केली आहे. एका वर्षात २ चक्रीवादळांचा सामना करून कोकणी माणूस हतबल झाला आहे. त्यातून सावरण्यासाठी सरकारकडून भरघोस मदतीची अपेक्षा होती. परंतु सरकारने आता निकष जाहीर केले आहेत. त्यामुळे उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत. सरकारने कोकणी माणसाची पुन्हा एकदा घोर निराशा केली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
सरकारकडून आंब्याच्या एका झाडाची किंमत ५०० रुपये, तर नारळाची किंमत २५० रुपये, सुपारीची किंमत ५० रुपये देण्यात येणार आहे. कोकणी माणूस ५०० रुपये डझन आंबा विकतो. शासन ५०० रुपये दर एका झाडाला देणार असेल, तर ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, अशा प्रकारची मदत देऊन सरकारने आमची चेष्टा करू नये. तुम्ही लोकांना त्याचे शुल्क माफ करता. मात्र, शेतकऱ्यांना मदत द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत, तर सोडूनच द्या, अशा भावना व्यक्त हाेत आहेत. मच्छिमारांनाही केलेली मदत पुरेशी नाही. बोटीवरील एका जाळीची किंमत ४० हजार रुपये, २५ हजार रुपये असते. परंतु सरकार मात्र ५ हजार रुपये मदत जाहीर करत असेल, तर ही निव्वळ फसणवूक आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केल्याचे म्हटले आहे.
-----------------------
कोकणातील अनेक बागायतदारांचे, मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर किनारपट्टीवरील अनेक घरांची पडझड झाली आहे, अशा कुटुंबीयांना सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा हाेती. पण या सरकारने केवळ आम्हा कोकणी माणसाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
- दीपक महाजन, आंबा बागायतदार
---------------------------
सरकारने नुकसानापाेटी दिलेली रक्कम तूटपुंजी आहे. सरकारकडे मदत देण्यासाठी पैसे नसतील, तर त्यांनी देऊ नये. पण काेकणी माणसाची चेष्टा करू नये. काेकणी माणूस स्वाभिमानी आहे, ताे काेणापुढे हात पसरणार नाही. पण अशी चेष्टाही सहन करणार नाही.
- संदीप राजपुरे, आंबा बागायतदार