रत्नागिरी : दुबईतील शासकीय निर्णय अतिशय जलद आहेत. आपल्याकडील प्रशासकीय यंत्रणा अतिशय संथ आहे. त्यामुळे कामाला लगेचच सुरुवात करता येत नाही. तसेच कामगार कायद्याचे पालनही तिथे चांगल्या तऱ्हेने होते. त्यामुळे कामगारांना हक्क लगेचच दिला जातो, मात्र, आपल्याकडे त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याची खंत दुबईस्थित प्रसिद्ध मसाले उद्योजक धनंजय दातार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांसमोर व्यक्त केली. येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात धनंजय दातार यांचे ‘स्वकर्तृत्त्वातून यशस्वी वाटचाल’ या विषयावर आज (शुक्रवारी) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटीदेखील मांडल्या.मूळ चिपळूण येथील असणाऱ्या दातार कुटुंबाच्या मागील तीन पिढ्या अकोल्यात स्थायिक झाल्या. दुबईत उद्योग विस्तार करताना आपण महाराष्ट्रातील कामगारांना प्राधान्य दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील मुले मुंबई, पुण्याला सहजच जातात, पण तिथून पुढे जाण्याचे धाडस करीत नाहीत. ते त्यांनी करायला हवे. संधीचा फायदा कसा घ्यावा, हे आपल्यावर अवलंबून आहे, असे म्हणाले.दातार यांनी दुबईतील अनुभव व्यक्त करताना सांगितले की, आपल्याकडे कामगारांना दिला जाणारा पगार अतिशय कमी आहे, त्या तुलनेने परदेशात कितीतरी पटीने जास्त असतो. तसेच कामगार कायद्याचेही पालन चांगल्या तऱ्हेने केले जाते. मात्र, आपल्याकडे कामगार संघटनांकडूनही कामगारांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कामगार कायद्याबाबत आखाती देशात कुठलाही कर नसल्याने त्याचा फायदा उद्योजकांना घेता येतो, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कामावर श्रद्धा हवी, पडेल ते काम करण्याची तयारी हवी, नवनवीन शिकण्याची इच्छा असेल आणि जबाबदारी घेण्याची तयारी असेल तर मोठे बनता येते. कोकणामध्ये डेव्हलपमेंट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी वंदना दातार, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, कार्यवाह प्राची जोशी, उद्योजक आनंद देसाई, प्रज्ञा भिडे, अमित उकेरीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मूळचे चिपळूण येथील असणारे दातार कुटुंबाच्या मागील तीन पिढ्या अकोल्यात स्थायिक झाल्या आहेत. दुबईत त्यांनी आपला उद्योग विस्तार वाढवला आहे. महाराष्ट्रातील कामगारांना प्राधान्य दिले आहे.
संथ प्रशासकीय यंत्रणा उद्योगाला त्रासदायक
By admin | Updated: October 9, 2015 22:10 IST