खरेतर पहिले लॉकडाऊन संपले आणि सर्वसामान्य जनतेशी निगडित अनेक प्रश्नांनी डोके वर काढले. त्यातील काही प्रश्न आजही सुटलेले नाहीत. त्याविषयी राजकीय पक्षांनी शासनदरबारी निवेदने दिली असली, तरी ते प्रश्न सुटले नाहीत किंवा ते सोडवण्यासाठी कोणाचा प्रयत्नही दिसत नाही. ना कोणाला बँकेचे व्याज माफ झाले आणि नाही कोणाला वीजबिलात सूट मिळाली. ज्याची वीजबिले थकली ते अंधारात झाकले गेले आणि कर्जबाजारी सावकारी खाली दबले गेले. इतकी भीषण परिस्थिती आज समाजाची आहे. परंतु, आता या प्रश्नांविषयी कोणीही बोलत नाही. सर्वसामान्य मात्र आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अगदी आरोग्य सुविधांचा जरी विचार केला तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी आठवडाभर लसीकरण झालेले नाही. अशा परिस्थितीत केवळ प्रशासकीय यंत्रणा शासनस्तरावर पाठपुरावा घेत असेल, तर ती चिंताजनक बाब म्हणावी लागेल. कारण, याबाबतीत लोकप्रतिनिधीची भूमिका महत्त्वाची असते. लोकप्रतिनिधी जे करू शकतो ते अधिकारी करू शकत नाही. काहीवेळा प्रशासनालाही मर्यादा येतात. परंतु, ऐकावे तर नवलच! कोणी म्हणे आमचे नेते पंढरपूरच्या निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. किमान आता तरी पक्षाचे झेंडे खाली ठेवा आणि माणुसकीची धुरा सांभाळा. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नाहीत, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात नाही. यातून जिल्ह्यात प्रशासनावरची कोरोनावरची पकड सैल झाल्याशिवाय राहणार नाही. याआधीच्या लॉकडाऊनमध्ये एखाद्या भागातील रुग्ण शोधून, त्यांचं ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्यासाठी व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी तातडीने यंत्रणा काम करीत होती. मात्र, आता फारसे सक्रिय प्रयत्न करण्यात येत नाहीत. ग्रामीण आणि शहरी भागातले नागरिकही कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ते वर्तन करताना दिसत नाहीत. मुंबई, पुण्यातून अनेक चाकरमानी गावी आले, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिणामी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा पसारा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत केवळ लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही. ही लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींची मानसिकता तितकीच महत्त्वाची आहे. ही वेळ पक्ष सांभाळण्याची नव्हे, तर माणुसकी जपण्याची आहे. भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर बेड संख्या वाढविणे, ऑक्सिजन बेड उपलब्ध करणे हे प्रशासन करू शकेल. परंतु, त्यासाठी लागणारे ऑक्सिजन उपलब्ध करणे, रुग्णवाहिका व अन्य यंत्रणा उभी करण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधीच हवा आहे. याशिवाय परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर सर्वसामान्यांना आधार देणाराही नेता हवा आहे. कारण, सगळ्यांना थोडी कळ सोसावी लागेल हे म्हणणे सोपे आहे, पण सोसणे अवघड झाले आहे.
हाताबाहेरची परिस्थिती जाण्याआधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST