गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेतील समर्थ इलेक्ट्रिकल्स या दुकानात शिरुन अज्ञात व्यक्तीने रोख रक्कम व किरकोळ वस्तूंची चोरी केली. अशा प्रकारे कौले काढून एकाच दुकानात घुसून चोरी करण्याचा हा आठवड्यातील दुसरा प्रकार आहे.शृंगारतळी बाजारपेठेत समर्थ इलेक्ट्रिकल्स हे दुकान आहे. जुन्या चाळीत असलेल्या या दुकानाच्या मागील भागात सामायिक पडवीचा भाग आहे. शेजारच्या देशी दारु दुकानाच्या मागील बाजूची कौले काढून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला आणि माळ्यावरुन दुकानात प्रवेश केला. समर्थ इलेक्ट्रिकल्समधील एक ड्रिल मशीन, ७ स्क्रू ड्रायव्हर व रोख रक्कम १५० (चिल्लर) चोरुन नेली. रविवारी रात्री ८.३० ते मंगळवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. यापूर्वी शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजीदेखील अशाच प्रकारे याच दुकानातून ४०० रुपयांची चिल्लर चोरण्यात आली होती. प्रफुल्ल प्रभाकर गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुहागर पोलिसांनी अज्ञाताविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस फौजदार व्ही. टी. जाधव अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
शृंगारतळी बाजारपेठेत दुकान फोडले
By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST