रत्नागिरी : रत्नागिरीतील ठेकेदार अभिजित शिवाजी पाटणकर याचा गोळ्या झाडून खून केल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोईन काझी उर्फ हेमंत उर्फ रौनी ब्रिंगेजा याला उत्तरप्रदेश पोलीस व रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी लखनौयेथे केलेल्या संयुक्त कारवाईत पकडले. त्याच्याकडील ४ मोबाईल फोन, २१ सीमकार्ड व अनेक बनावट ओळखपत्र हस्तगत करण्यात आले. रत्नागिरी पोलीस त्याला घेऊन मंगळवारी रत्नागिरी येथे पोहोचणार आहेत. रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर येथे राहणाऱ्या अभिजित पाटणकर याला कारवांंचीवाडी-पोमेंडी येथील रेल्वेपुलाजवळ नेऊन चार गोळ्या झाडून त्याचा खून केल्याचा आरोप मोईनवर आहे. या प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी आधीच तीन आरोपींना अटक केली आहे. पकडलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार मोईन काझी याने अभिजितवर गोळ्या झाडल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर मोईन हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी रत्नागिरी पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे मोईन हा सातत्याने आपले राहण्याचे ठिकाण बदलत पोलिसांना हुलकावणी देत होता. त्यामुळे पोलिसांनीही ‘धीरेसे’ या धोरणाचा अवलंब करीत मोईनला स्थिर होऊ दिले व त्याच्या ठावठिकाण्यावर लक्ष ठेवले होते. मोईन काझी हा उत्तरप्रदेशमध्ये असल्याची कुणकुण लागल्यावरून रत्नागिरी पोलिसांनी याबाबत उत्तरप्रदेश एसटीएफ पोलिसांशी संपर्क साधला व आरोपीस पकडण्याबाबत मदत मागितली. मोईन हा लखनौ येथे असल्याचे समजल्यावर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे आणि एस.टी.एफ.चे पोलीस अधीक्षक अमित पाठक यांनी मोईनला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम आखली. रत्नागिरीतून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लखनौ येथे पाठवण्यात आले. रत्नागिरी पोलीस व एस.टी.एफ.च्या संयुक्त मोहीमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अरविंद चतुर्वेदी यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर मोईन काझी याला जानकीपुरम येथे पाहिल्याची खबर पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मोईन याला अटक केली. त्याच्याविरोधात जानकीपुरम पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता उत्तरप्रदेश पोलीस मोईनच्या उत्तरप्रदेशातील अन्य सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षकांकडून कारवाईबाबत दुजोरा मोईन काझी याला संयुक्त कारवाईत उत्तरप्रदेशातील जानकीपुरम येथे पकडण्यात आल्याबाबत विचारता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. त्याबाबत त्यांनी या कारवाई पथकात सहभाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच उत्तरप्रदेश पोलिसांच्या सहकार्याबाबतही प्रशंसा केली. याबाबत आपण प्रसारमाध्यमांना मंगळवारी माहिती देणार असल्याचे सांगितले. तीन आरोपींची झाडाझडती... अभिजित पाटणकर याचा आर्थिक व्यवहारातून खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला तिघांना अटक केली होती. त्यामध्ये रिहाज हुसेन नदाफ (२०, कोकणनगर, रत्नागिरी), फजेल अहमदमियॉँ काझी (२०, मजगाव), आसीफ करीम खान (२४, उत्तरप्रदेश) या तिघांचा समावेश होता. पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली होती, तसेच मोईन काझी याने अभिजितवर गोळ्या झाडल्याचेही तपासात आरोपींनी सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तपासकाम सुरू केले होते. मात्र, फरार सूूत्रधार मोईनला शनिवारी लखनौ येथे पोलिसांनी अटक केली. (प्रतिनिधी)
शूटर मोईनला लखनौमध्ये अटक
By admin | Updated: September 15, 2015 00:02 IST