रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅँकेच्या ५ मे २०१५ रोजी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत शिवसंकल्प पॅनेलने सत्ताधारी सहकार पॅनेलच्या विरोधात रणशिंग फुकंले आहे. शिवसंकल्प पॅनेलतर्फे २१पैकी आज उद्योजक किरण सामंत, सुधीर कालेकर यांच्यासह ८ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उर्वरित १३ उमेदवारी अर्ज उद्या (बुधवार) दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे यावेळी सहकार पॅनेल व शिवसंकल्प पॅनेल यांच्यात जोरदार ‘टकराव’ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘शिवसंकल्प’ने दाखल केलेले ८ व व्यक्तीगत २ असे १० अर्ज आज दाखल झाले. दोन दिवसात दाखल अर्जांची संख्या ४६ झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बॅँक निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याचे सांगण्यात येत होते. बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनीही बिनविरोध निवडणुकीचे संकेत दिले होते. संचालक मंडळातील २१ जागांपैकी सेनेला २, भाजपला ३, कॉँग्रेसला ६ व उर्वरित जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसला असे समीकरण मांडण्यात आले होते. मात्र, जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असताना व शिवसेनेचे राजकीय प्राबल्य असताना केवळ दोन जागांवर समाधान मानण्यास शिवसेना तयार नव्हती. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंकल्प पॅनेलची स्थापना करण्यात आली असून, सत्ताधारी सहकार पॅनेलला सेनेकडून आव्हान देण्यात आले आहे. निवडणुकीसाठी शिवसेनाप्रणीत शिवसंकल्प पॅनेलतर्फे आज (मंगळवार) उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद उकर्डे यांच्या कार्यालयात ८ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये विकास सोसायटी मतदारसंघातून अनुक्रमे किरण सामंत (रत्नागिरी), विलास चाळके (संगमेश्वर), सुधीर कालेकर (दापोली), दिवाकर मयेकर (राजापूर) यांचा तसेच दुर्वास वणकर (औद्योगिक), सत्यवान शिंदे (पणन), गणेश लाखण (दुग्ध), गीतांजली सावंत (महिला मतदारसंघ) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)शिवसंकल्पच्या उर्वरित १३ उमेदवारांची यादी तयारशिवसंकल्प पॅनेलतर्फे मंगळवारी आठ अर्ज दाखल झाले. शिवसेनेच्या अन्य १३ उमेदवारांची नावे निश्चित झाली असून, त्यात अॅड. वामन गांजेकर (खेड), वनिता डिंगणकर (गुहागर), आदेश आंबोळकर (लांजा), विलास किंजळे (शेळी, मेंढी, कुक्कुटपालन मतदारसंघ), विजय इंदुलकर (नागरी पतसंस्था, चिपळूण), खेडेकर (गृहनिर्माण, चिपळूण), सुरेश डांगे (मजदूर व स्वयंरोजगार, चिपळूण), सिध्दार्थ देवधेकर (अनुसूचित जाती, लांजा), गजानन पाटील (ओबीसी, रत्नागिरी), रचना महाडिक व नेत्रांजली आखाडे (महिला), दिनकर कदम (मंडणगड) व अनंत तेटांबे (चिपळूण) यांचा समावेश आहे. या यादीत किरकोळ बदल होणे शक्य असल्याचे शिवसंकल्प पॅनेलच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेने फुंकले रणशिंग
By admin | Updated: April 8, 2015 00:29 IST