राजापूर : प्रशासनाचे दुर्लक्ष झालेल्या तालुक्यातील साखरीनाट येथील किल्ले घेरा यशवंतगड संवर्धन मोहीम शिवसंघर्ष संघटना, ओमसाई मित्रमंडळ, व्यापारी संघटना यांच्याामार्फत राबविण्यात आली. या मोहिमेत ७० शिवप्रेमी सहभागी झाले होते. यात स्थानिक महिलांसह दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
भूगोल स्पर्धेत यश
खेड : मुंबई येथील बाॅम्बे जिऑग्राॅफिकल असोसिएशन व नगीनदास खांडवाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मिसेस कणी मेमोरिअल ऑनलाइन भूगोल स्पर्धेत आयसीएस महाविद्यालयाने यश मिळविले आहे. संस्थाध्यक्ष हिराभाई बुटाला यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आरोग्य केंद्रात लसीकरण
मंडणगड : तालुक्यातील केळशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. उंबरशेतचे माजी सरपंच यशवंत बटाले यांना पहिल्यांदा लस घेण्याचा मान मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. चंद्रकांत कदम यांनी लसीबाबत मार्गदर्शन करून लस घेण्यासाठी आवाहन केले.
कलिंगडाचा दर घसरला
रत्नागिरी : जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कलिंगड लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अनेक भागांत कलिंगडाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, यावर्षी कलिंगडाचे दर खूपच खाली आले आहेत. ५० ते ६० रुपयांना मिळणारे कलिंगड या शेतकऱ्यांना २० ते २५ रुपये दराने द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
वाहतूकीची कोंडी
रत्नागिरी : शहरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. परिणामी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, वाहनतळांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
गावठी भाज्यांना मागणी
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर, धनजी नाका, गोखले नाका आणि बसस्थानक परिसर आदी भागांमध्ये गावठी भाजी विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. या भाजी विक्रेत्यांमध्ये स्थानिकांकडून गावठी भाज्या विकल्या जातात. या भाज्यांना जास्त मागणी आहे. ही ताजी भाजी मिळत असल्याने ग्राहकांकडूनही मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
रत्नागिरी : तालुक्यातील मावळुंगे-नातुंडे गावातील संस्कार प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. हे शिबिर संपल्यानंतर प्रतिष्ठानतर्फे स्मशानभूमी परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी या प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
उकाड्याचा त्रास असह्य
चिपळूण : दिवसेंदिवस उकाडा वाढू लागला आहे. घामाच्या धारांनी नागरिकांना असह्य केले आहे. सध्या शीतपेये, सरबते यांचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे. शहरात विविध कामांसाठी तालुक्यातून येणारे नागरिक सरबत विक्रेते, शीतपेये विक्रेते, रसपानगृह यांच्याकडे वळू लागले आहेत. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागल्याने उकाडा वाढला आहे.
मच्छरांचा उपद्रव
लांजा : सध्या मच्छरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सायंकाळी हे मच्छर घरात घुसतात. त्यामुळे नागरिकांना मच्छर अगरबत्ती तसेच अन्य उपायांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या उकाडा वाढल्याने तसेच काही ठिकाणी गटारे उघडी असल्याने सांडपाण्यामुळे मच्छरांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत.
विकासकामे मंजूर
दापोली : रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना २०२० -२१ क वर्ग पर्यटनस्थळ विकासकामांतर्गत मुरूड येथील प्रस्तावित कामांना निधीसह मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये रस्ता डांबरीकरण, ग्रॅव्हिटी नळपाणी योजना, नवीन साठवण टाकी बांधणे, सिमेंट काॅंक्रिटची गटारे बांधणे आदी कामांचा समावेश असून, या कामांसाठी निधी मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.