शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
3
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
4
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
7
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता
8
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
9
Anil Chauhan: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य
10
यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट
11
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
12
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
13
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
14
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
15
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
17
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
19
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
20
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!

शिवधनुष्य स्वच्छतेचं!

By admin | Updated: November 22, 2014 00:13 IST

हे अभियान म्हणजे दुसऱ्याने आपल्यासाठी स्वच्छता मोहीम राबवणे एवढ्यापुरतेच मर्यादीत असल्याचा अनेकांचा समज आहे.

आ पल्या भल्याचं म्हणून जे काही असेल ते सारं करण्याची जबाबदारी सरकारची, ही वर्षानुवर्षाची आपली मानसिकता. मी नागरिक आहे आणि मला सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी आहे, हीच आमची ठाम भावना. पण, हा अधिकार मिळवण्यासाठी आपण काही कर्तव्यही पार पाडायला हवी आहेत, हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरतो. म्हणूनच आता जिकडे-तिकडे मोठ्या गाजावाजाने सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाबद्दल मनात भीती निर्माण होत आहे. हे अभियान म्हणजे दुसऱ्याने आपल्यासाठी स्वच्छता मोहीम राबवणे एवढ्यापुरतेच मर्यादीत असल्याचा अनेकांचा समज आहे. पण, आपण यापुढे आपल्या वैयक्तिक परिसरासह सार्वजनिक परिसरही स्वच्छ ठेवू, अशी शपथ देणारं हे अभियान आहे, हे अनेकजण सोयीस्कर विसरू लागले आहेत. आताच्या मोहिमेत रस्ते, गल्लीबोळ स्वच्छ दिसू लागले आहेत. पण म्हणून यापुढे अशीच स्वच्छता दिसेल, अशी अपेक्षा करणं थोडं धोक्याचं वाटत आहे. स्वच्छता हे शिवधनुष्य आहे. सगळ्याच कामांची सरकारकडून अपेक्षा करणाऱ्या सर्वसामान्यांना हे शिवधनुष्य पेलेल का?स्वच्छता हा स्थायीभावच असावा लागतो. शिकवली विद्या आणि बांधली शिदोरी आयुष्यभर पुरत नाही, असं जुनीजाणती माणसं सांगतात. स्वच्छताही त्यातीलच एक आहे. ती शिकवून येत नाही. ती मुळातच असावी लागते. त्यात आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण स्वयंप्रेरणेने काहीही करत नाही. प्रत्येक कामासाठी आपल्याला कोणीतरी नेता लागतो. आपण सर्वोत्कृष्ट अनुयायी होऊ शकतो, पण एखादी गोष्ट आपण स्वत:हून पुढे नेऊ शकत नाही, हे आपले सर्वांचे दुर्दैव आहे. अर्थात सगळेच नेते असून चालत नाही. अनुयायी लागतातच. पण, आपण नेहमीच अनुयायाच्या भूमिकेवरच समाधानी राहतो.आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून का होईना, पण जिकडे-तिकडे स्वच्छतेच्या चर्चा आणि कृती दोन्ही सुरू झाल्या आहेत. या मोहिमेचे दोन भाग आहेत. छायाचित्रासाठी हातात झाडू घेणारे अधिकारी आणि नेते हा या मोहिमेचा एक भाग आणि प्रत्यक्ष प्रामाणिक कृती करून स्वच्छता मोहीम यशस्वी करणारे हजारो, लाखो हात. हे दोन्ही घटक महत्त्वाचे. छायाचित्रासाठी हातात झाडू घेणाऱ्यांनी या मोहिमेला (स्वत:साठी का होईना) चांगली प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस हा विषय सतत चर्चेत राहिला आहे. दुसरा प्रकार सर्वात महत्त्वाचा. तो म्हणजे प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांचा. या हातांना मनापासून सलाम केला पाहिजे. केवळ आपल्याच नाही तर दुसऱ्यांच्या शहरात जाऊन तिथला कचरा उचलणाऱ्यांना हा सलाम आहे.स्वच्छता मोहीम सुरू झाल्यानंतर ती किती आणि कशी राबवली जात आहे, यावर चर्चा होण्याऐवजी पंतप्रधानांनी हातात झाडू घेणे योग्य की अयोग्य, यावरच चर्चा सुरू आहे. अर्थात अनेकांचं पोट या चर्चेवरच भरतं. त्यामुळे या चर्चेला आक्षेप घेण्यापेक्षा या मोहिमेचा विचार करणेच अधिक हितावह ठरेल.रत्नागिरी जिल्ह्यात ही मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे. शहरांमधील मुख्य रस्ते, गल्ली-बोळ स्वच्छ दिसू लागले आहेत. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या नऊ हजारांहून अधिक श्री सदस्यांनी जिल्ह्यातील आठ शहरांमध्ये जबरदस्त काम केले आहे. त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं. मोठ्या प्रमाणात कचरा उचलला गेला आहे. नगर परिषदांनी मोहीम राबवली आहे. अनेक संस्थांनी त्यात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आज तरी सगळी शहरं, गावं खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छ दिसत आहेत. हीच मोहीम शासकीय कार्यालयांमध्येही राबवली गेली. वर्षानुवर्षे बासनातच गुंडाळल्या गेलेल्या अनेक प्रकरणांना स्वच्छतेसाठी म्हणून का होईना, हात लागला आहे. मोदींनी केलेल्या आवाहनामुळे हा सगळा बदल झाला आहे.आता इथून पुढची जबाबदारी मात्र तुमची-आमची आहे. या सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था एकदा आपल्यासाठी रस्त्यावर उतरल्या. आता त्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागू नये, यासाठी पुढची जबाबदारी आपली आहे. रस्त्यावर कचरा न फेकणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे. गाडीतून किंवा गाडीवरून जाताना कागद, खाण्याच्या रिकाम्या पिशव्या (रॅपर), चॉकलेटचे कागद, गुटख्याच्या पुड्या रस्त्यावरच टाकल्या जातात. पाण्याच्या बाटल्या हा तर सर्वात मोठा कचरा. रेल्वेतून प्रवास करताना चहा पिऊन झाला की, कप खिडकीतून वाऱ्यावर भिरकावून देण्यात आपल्याला आनंद वाटतो. किमान यापुढे तरी आपल्या काही चुकीच्या सवयी आपण बदलायला हव्यात. प्रवासात आपल्यासोबत कचऱ्यासाठी एखादी पिशवी हवी. पाण्याची रिकामी बाटली, चहाचा कप यांसारख्या कुठल्याही गोष्टी त्यातच टाकल्या गेल्या पाहिजेत. आपण स्वच्छता मोहिमेत कोठेही झाडू घेऊन सहभागी झालो नसलो तरी कचरा न करण्याची शपथ घेतली आणि ती पाळली तरी या मोहिमेत तो मोठा सहभाग ठरेल.शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबतची चुणूक अधिक दिसते. आपल्या पालकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, यासाठी ते आग्रही असतात. यामागे कदाचित पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा प्रभाव असेल. स्वच्छतेमागचे कारण कदाचित त्यांना आत्ता कळले नसेल. पण, कारण कळो किंवा न कळो कचरा रस्त्यावर न टाकण्याची सवय त्यांना लागली तर आणखी काही वर्षांनी अशी मोहीम राबवण्याची वेळ येणार नाही. कुठलीही चांगली गोष्ट एक वेळ करायला सोपी असते. पण ती सातत्याने करणे तेवढेच अवघड असते. शिवधनुष्य पेलण्याइतकेच ते अवघड असते. पण ते अशक्य नाही. इच्छाशक्ती असली तर ते साध्य होऊ शकेल. किमान स्वच्छतेबाबत तरी प्रत्येकाने यापुढे सरकारकडून कसल्याही अपेक्षा न करता स्वत:च स्वत:पुरती काळजी घेतली तरी ही मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल.स्वच्छतेचे फायदे, त्याची गरज सर्वांनाच माहिती असते. पण त्यात आपली जबाबदारी मात्र आपल्याला कळत नाही. हेच चित्र बदलूया. यापुढे सार्वजनिक जागी कचरा टाकणार नाही, एवढी तरी शपथ घेऊया. आपलं घर, आपलं आवार, आपली गल्ली, आपलं शहर असं करता करता आपला देश स्वच्छ होऊन जाईल. एका दिवसात हे होणार नाही. पण त्याची सुरूवात लवकर झाली तर त्याचे परिणामही लवकर दिसायला लागतील, हे नक्की.मनोज मुळ्ये