रत्नागिरी/चिपळूण : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्यापोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन शेट्ये यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे पुत्र केतन शेट्ये यांचा ६२३ मतांनी पराभव केला. दुसरीकडे चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे महेश कातकर हे विजयी झाले.या दोन्ही ठिकाणी रविवारी मतदान झाले होते. मतमोजणी सोमवारी सकाळी सुरू झाली. रत्नागिरीत अवघ्या २० मिनिटात मतमोजणी संपली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग २ (अ)मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन शेट्ये विजयी झाले. त्यांनी निकटचे उमेदवार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे केतन शेट्ये यांचा ६२३ मतांनी पराभव केला. राजन शेट्ये यांना १८१३, तर केतन शेट्ये यांना ११८८ मते मिळाली. भाजपचे उमेदवार उमेश कुळकर्णी यांना ९५४ मते मिळाली. राजन शेट्ये यांच्या विजयाची घोषणा होताच नगरपरिषद आवारात व जयस्तंभ परिसरात शिवसैनिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला.चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे झालेल्या जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे महेश कातकर विजयी झाले. याठिकाणची मतमोजणी पाच फेऱ्यांत संपली. राष्ट्रवादीचे महेश शिवराम कातकर यांना ३४२८, शिवसेनेचे प्रमोद सुरेश शिवळकर यांना २६२४, भारतीय जनता पक्षाच्या मीना गोविंद अवेरे यांना २५२६, तर काँग्रेसचे नीलेश दौलत भडवळकर यांना ११३६ मते मिळाली. या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही नाहीसाठी (नोटा) १९९ मते पडली. राष्ट्रवादीचे कातकर हे ८०४ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत शिवसेना, रामपुरात राष्ट्रवादी
By admin | Updated: January 12, 2016 00:30 IST