लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विक्रांत जाधव यांना अध्यक्षपद देथन शिवसेनेने एकाच दगडात चार पक्षी मारले आहेत. एका बाजूला विक्रांत जाधव राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे राज्यातल्या सत्तेप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे चित्र निर्माण झाले. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र असल्याने विक्रांत जाधव हेही आता शिवसेनेचेच झाले आहेत. यातला तिसरा अर्थ म्हणजे मंत्री पद न दिल्याने भास्कर जाधव यांच्या मनातली नाराजीही यातून दूर झाली आहे.
विक्रांत जाधव हे गुहागर तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून विजयी झाले. ते राष्ट्रवादीचे गटनेतेही झाले. त्यावेळी आमदार भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर दाेन वर्षांनी भास्कर जाधव शिवसेनेत गेले. विक्रांत जाधव कागदोपत्री अजूनही राष्ट्रवादीचेच आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीप्रसंगी विक्रांत जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचे वृत्त लाेकमतने आधीच दिले होते. प्रत्यक्षात तेच घडले. सोमवारी या पदासाठी केवळ विक्रांत जाधव यांचाच अर्ज दाखल झाला. त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली. या नावावर शिक्कामोर्तब करून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. राष्ट्रवादीचे गटनेते असलेल्या जाधव यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केल्यामुळे येथे महाविकास आघाडी आहे, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला, हा शिवसेनेचा फायदा आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीला दूर सारले नाही, असे चित्र शिवसेनेने निर्माण केले आहे.
जरी जाधव कागदोपत्री राष्ट्रवादीत असले तरी वडील भास्कर जाधव यांच्यासोबत ते सावलीसारखे असल्याने अध्यक्षपदावर शिवसेनेचेच वर्चस्व राहणार आहे. हाही शिवसेनेचाच फायदा आहे. जाधव म्हटले तर राष्ट्रवादी आणि म्हटले तर शिवसेनेचे असे आहेत. आमदार भास्कर जाधव यांना अनुभव असतानाही मंत्री पद मिळाले नाही. त्यांनी जाहीर बोलून दाखवली नसली तरी याची खंत त्यांच्यात मनात आहे. आता त्यांच्या मुलाला जिल्हा परिषद अध्यक्षपद देऊन शिवसेनेने थोडीशी फुंकर मारली आहे. हाही शिवसेनेचाच फायदा आहे.
शिवसेना आणि भाजप यांची युती असताना गुहागर विधानसभा मतदारसंघ कायम भाजपकडे होता. युती तुटल्यानंतर तो राष्ट्रवादीकडे गेला. गेल्या विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांच्या रूपाने हा मतदार संघात प्रथमच शिवसेनेचा आमदार झाला असला तरी या क्षेत्रात आपले पाय मजबूत करण्यासाठी, भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवसेनेने या तालुक्याला अध्यक्षपद दिले आहे. असे चार पक्षी शिवसेनेने एकाच दगडात मारले आहेत.
उदय बने उपाध्यक्ष होणार
अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे प्रतोद उदय बने यांच्या नाराजीनंतर त्यांनी वरिष्ठांनी समजूत काढली. उपाध्यक्षपदावर लवकरच बने यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच उपाध्यक्षांकडे असलेले कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद बदलण्यात येणार आहे. त्यासाठी बने यांना बांधकाम व आरोग्य सभापतीपद देण्यात येणार आहे.
दुसरे आमदार पुत्र झाले अध्यक्ष
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद लागोपाठ दोन्ही वेळा आजी-माजी आमदार पुत्रांना देण्यात आले. यापूर्वी माजी आमदार सुभाष बने यांचे चिरंजीव रोहन बने यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ शिवसेनेकडून घालण्यात आली.