कॅप्शन- रत्नागिरी शहरातील राजीवडा गावातील आरक्षित जागेत मच्छी मार्केटच्या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांना राजीवडा कोअर कमिटीतर्फे देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राजीवडा गावातील मच्छिमारांच्या सोयीसाठी आरक्षित जागेमध्ये मच्छी मार्केट बांधण्याची मागणी जमातुल मुस्लिमीन राजीवडा काेअर कमिटीतर्फे नगर परिषदेकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे देण्यात आले आहे.
भाट्ये खाडीकिनारी असलेल्या राजीवडा गावामध्ये मच्छीमार समाजाची ९९ टक्के वस्ती आहे. येथील रहिवाशांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे तसेच मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मुस्लिम मच्छीमार समाजाची वस्ती असलेले नगर परिषदेच्या हद्दीतील राजीवडा हे गाव आहे. या गावामध्ये शिवखोल मोहल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मच्छी बाजार भरतो. त्यामुळे रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.
यापूर्वी राजीवडा गावातील जामा मस्जिदच्या जवळच भररस्त्यावर मच्छी बाजार भरत होता. मात्र, सुमारे २० वर्षांपूर्वी राजीवडा गावातील शेखअहमद हुश्ये यांनी स्थापन केलेल्या राजीवडा महिला मंडळाने हा मच्छी बाजार हलवून शिवखोलकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला आणला होता. दरम्यान, वाढत्या लोकसंख्येमुळे मच्छी बाजारासह येथे भाजी-फळ विक्रेतेही मोठ्या प्रमाणात बसू लागले आहेत. त्यामुळे रहदारीला मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी रहदारीला अडचण होऊ नये, यासाठी मच्छी विक्रेते व भाजी-फळ विक्रेते यांना रस्त्याचा कडेला एका बाजूला बसविण्याचे नियोजन करते.
रत्नागिरी नगर परिषदेने राजीवडा गावातील दलाल कंपाऊंडच्या शेजारील जागा मच्छी मार्केटसाठी आरक्षित ठेवली आहे. या आरक्षित जागेत मच्छी मार्केटची इमारत तयार झाल्यास त्याठिकाणी मच्छी मार्केट भरविण्यात येईल. त्यामुळे रहदारीसाठी होणारी अडचण दूर होऊन मच्छिमारांसाठीही हे मार्केट सोयीचे ठरणार आहे. याबाबत राजीवडा कोअर कमिटीने नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, उपाध्यक्ष शब्बीर भाटकर, महंमद सईद फणसोपकर, नगरसेवक सुहेल मुकादम, सचिव शफी वस्ता, इमरान सोलकर, शेखअहमद हुश्ये, नुरमहंमद सुवर्णदुर्गकर, सलाऊद्दीन सुवर्णदुर्गकर, जाविद मस्तान, लुकमान कोतवडेकर, आशफाक नावडे, आशफाक काद्री, शौकत पावसकर, फैज काद्री, शकील दाव्त, चांदखान बुड्ये व अन्य उपस्थित होते.